gabh
gabhsakal

Gaabh Movie: 'हा चित्रपट म्हणजे आमची पाच वर्षांची मेहनत', 'गाभ' चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्यक्त केल्या भावना

गाभा चित्रपटाचे निर्माते मंगेश गोटूरे यांनी सकळशी विशेष गप्पा मारल्या.

शब्दांकन : मयूरी महेंद्र गावडे

प्रेमकथा आणि त्याभोवती असलेली गोष्ट म्हटली की, प्रेक्षकांच्या मनात एक साधारणपणे आपल्यासमोर येते ते नायक-नायिकेचे प्रेम, दोन-चार गाणी, प्रेम पूर्णत्वास नेण्यासाठी धडपड करणारे मित्र, प्रेमाच्या विरोधात असणारे खलनायक असे सगळे, मात्र रुपेरी पडद्यावरील प्रेमकथेची हीच चौकट मोडण्याचा धाडसी प्रयत्न ‘गाभ’च्या निमित्ताने दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी केला आहे. या चित्रपटात कैलास वाघमारे आणि सायली बांदकर प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे निर्माते मंगेश गोटूरे यांच्याशी केलेली खास बातचीत...

Q

गाभ चित्रपट रिलीज झाल्यावर त्याला आता प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी काय सांगाल?

A

खरंतर चित्रपट रिलीज झाल्यानंतर येणारा प्रतिसाद काय असेल, याविषयी आमच्या अपेक्षा आणि त्याचा एकूणच अंदाज काय असेल, हे आम्ही ठरवूनच काम करत होतो, पण मला आता सांगायला आवडेल की, जे आम्ही ठरवलं होत किंवा याविषयी आमच्या ज्या अपेक्षा होत्या, त्यापेक्षा जास्त चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला. या सगळ्यांमध्ये जेवढी आमची गुंतवणूक आहे, त्याहून अधिकची परतफेड आम्हाला मिळाली आहे. याचा खूप आनंद आहे. यामागे आमचे कष्टदेखील खूप होते, पण जेव्हा आपल्याला आपल्या यशाचे फळ मिळते, तेव्हा आपण नव्याने गोष्टी करायला प्रोत्साहित होतो, असे मला वाटते.

Q

आता चित्रपटाला जे यश मिळते आहे, त्याबद्दल एक निर्माता म्हणून काय भावना आहेत?

A

सर्वांत पहिले तर जेव्हा आपण चित्रपटनिर्मिती करत असतो आणि त्यावेळी आपल्यासोबत काम करणारी जी माणसं असतात, ती जर त्या-त्या विभागात पारंगत असली की, आपलं काम खूप चांगलं होतं. म्हणजे चित्रपटाचे कथानक असेल, ते संवाद लिहिणारे लेखक असतील, दिग्दर्शक असतील किंवा मग चित्रपटाची स्टारकास्ट, यांची भूमिका फार महत्त्वाची ठरते आणि या सगळ्याबाबतीत मी खूप समाधानी आहे. आमच्या सर्व टीमने त्यांचे त्यांचे काम खूप चांगले केले आहे. आता जे आम्हाला यश मिळत आहे, हे त्या मेहनतीचे फळ आहे.

Q

तुम्हाला असं का वाटलं की, हा चित्रपट करावा?

A

सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण जेव्हा व्यावसायिक चित्रपट करायला जातो, त्यावेळी आपले बजेट महत्त्वाचे असते. कारण व्यावसायिक चित्रपट म्हटलं की, मार्केटिंग आलं. स्टोरी, मार्केटिंग त्यासोबतच स्टारकास्ट या गोष्टी जर तुमच्याकडे खूप चांगल्या दर्जाच्या असतील, तर तुमचा चित्रपट नक्कीच हिट होतो आणि कमर्शियल चित्रपट बनवण्यासाठी तुमच्याकडे जर फंड्स नसतील, तर अशी स्टोरी निवडावी जी कमी बजेटमध्येसुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळेल. जेणेकरून पुढे जेव्हा तुम्ही नवीन प्रोजेक्ट कराल, तेव्हा ती परतफेड झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी या चित्रपटाची निवड केली. मुख्य कारण म्हणजे ही कथा जेव्हा माझ्याकडे आली होती, तेव्हाच यामध्ये दम आहे, हे मला जाणवलं.

Q

कलाकार निवडीमध्ये तुमची भूमिका काय होती?

A

कलाकारांच्या निवडीत माझी प्रत्यक्ष भूमिका नव्हती. हे काम आमचे दिग्दर्शक आणि बाकी आमचे टीम मेंबर यांनी केले. कारण मी या क्षेत्रातच नवीन होतो आणि आमचे दिग्दर्शक आणि बाकी मंडळींकडे खूप चांगला अनुभव आहे. त्यामुळे हे काम त्यांनीच केले, पण मी कलाकारांविषयी एक सांगेन की, हे सर्व खूप छान तगडे कलाकार आहेत. कैलास असो किंवा सायली असो, तसंच बाकी कलाकारांनीदेखील त्यांचं बेस्ट दिलं आहे, या कामासाठी. ॲक्टिंग असो, मार्केटिंग असो, तसंच जे शेड्यूल ठरवलं होतं, त्याचं गांभीर्य जाणून घेऊन त्यांनी खूप छान सहकार्य केलं.

Q

चित्रपट चित्रीकरणानंतर प्रॉडक्शनचे काम खूप महत्त्वाचे असते, याविषयी तुम्हाला काय वाटते?

A

मी या क्षेत्रात नवीन आहे, पण तरीसुद्धा सगळ्या विभागात, जी कामं चालतात ती मी जवळून पाहिली आहेत. मी सर्वांमध्ये होतो, ज्यामुळे सगळ्याचाच थोडा थोडा अनुभव मला मिळाला. मला असं वाटतं की, प्रत्येक प्रोड्यूसरने या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घेणं गरजेचं आहे. ज्यामुळे आपल्याला समजेल की, कुठे पैसा लावला पाहिजे आणि कुठे नाही. तसेच शूटिंगनंतर येणारी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्केटिंग. आपण प्रॉडक्शनमध्ये जेवढा पैसा लावतो, त्याहून अधिक आपल्याला मार्केटिंगमध्ये घालावा लागतो. कारण की जोपर्यंत आपल्या चित्रपटाची माहिती मार्केटमध्ये जाणार नाही, तोपर्यंत प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत येणार नाही. त्यामुळे या गोष्टींचा अभ्यास करणे जास्त गरजेचं आहे, असं मला वाटतं. ज्याला मार्केट ग्राफ खूप छान करता येतो, तो यशस्वी प्रोड्यूसर असतो.

Q

या क्षेत्रात तुम्ही नवीन होतात, तर काही आव्हाने आली का आणि तुम्ही त्याला कसे सामोरे गेलात?

A

हो नक्कीच आव्हानं आली, पण त्यांना सामोरं जाणं माझ्यासाठी फारसं कठीण नव्हतं. याचं मुख्य कारण म्हणजे आमची टीम. मी हे पुन्हा सांगतो, जेव्हा एखादं काम करणारी टीम तगडी असते, तेव्हा ते काम नक्कीच यशस्वी होतं. आता टीम म्हणजे फक्त, स्टारकास्ट, डायरेक्टर किंवा स्क्रिप्ट रायटर एवढेजण नव्हतो, तर स्पॉटबॉयपासून तिथे काम करणारी सगळीच माणसं. सर्वजण खूप छान होते. एकमेकांना सांभाळून घेत काम करत होते आणि हा चित्रपट म्हणजे आमची पाच वर्षांची मेहनत आहे आणि मी नवीन असल्यामुळे अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या. खूप छान अनुभव होता हा, जो मला नक्कीच पुढे माझ्या वाटचालीमध्ये कामी येईल.

gabh
Ashadhi Wari 2024: हेच खरं सुख! टाळांच्या ठेक्यावर नाचली, फुगडी खेळली, वारीच्या रंगात रंगली मराठी अभिनेत्री
Marathi News Esakal
www.esakal.com