Ghudchadhi Review: जुन्या प्रेमकथेला नवीन नात्यांची फोडणी; कसा आहे रवीना टंडन- संजय दत्त यांचा 'घुडछढी

Ghudchadhi Movie Review: दुहेरी प्रेमकथेचा गुंफलेला बंध म्हणजे रवीना टंडन आणि संजय दत्त यांचा 'घुडछढी' हा चित्रपट आहे.
Ghudchadhi
Ghudchadhi esakal
Updated on

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या नवनवीन आणि हुशार तसेच कल्पक लेखक आणि दिग्दर्शकांची फळी उभी राहात आहे. त्यांच्या कथा-कल्पना आणि तिची मांडणी वेगळी आहे. त्यांच्या काही चित्रपटांतून मनोरंजनाबरोबरच सामाजिक संदेशही दिला जात आहे. दिग्दर्शक बिनाॅय गांधीच्या घुडछडी या चित्रपटामध्ये एक वेगळा विचार मांडण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये दोन जोडप्यांची कथा मांडण्यात आली आहे. हास्यविनोदाबरोबरच प्रेम, आपुलकी तसेच कौटुंबिक नातेसंबंध-भावभावना अशा सगळ्याच बाबी दिग्दर्शकाने छान या चित्रपटामध्ये मांडलेल्या आहेत.

कल्याणी देवी (अरुणा इराणी) ही जुन्या विचारसरणीची आणि आपले रीतिरीवाज पाळणारी असते. तिचा मुलगा वीर शर्मा (संजय दत्त) हा लष्करातून निवृत्त झालेला असतो. त्याचा मुलगा चिराग (पार्थ समथानी) आता वयात आलेला असतो. तो मार्केटिंगचे काम करीत असतो. त्याच्या लग्नाची चिंता कल्याणीला लागलेली असते. ती त्याला विविध मुलींची स्थळे सुचवीत असते. परंतु त्यातील एकही मुलगी त्याच्या पसंतीस उतरत नाही. दरम्यान एका सेलिब्रेशन पार्टीमध्ये चिरागची आणि देविकाची (खुशाली कुमार) नजरानजर होते. त्यानंतर आपल्या ब्रॅण्डच्या मार्केटिंगनिमित्त चिराग ज्या कार्यालयात जातो तेथे पुन्हा देविकाची आणि त्याची भेट होते. साहजिकच या भेटीनंतर त्यांच्यामध्ये प्रेमाचे अंकुर फुलत जातात.

त्यानंतर ते दोघेही लग्न करण्याचा निर्णय घेतात तोच कहाणीला एक वेगळा ट्विस्ट मिळतो. त्याचे वडील वीर शर्मा यांच्या असफल प्रेमाचा फुलोरा पुन्हा फुलण्यास सुरुवात होते. त्यांची गाडी ट्रॅफिक जाममध्ये अडकलेली असताना तेथे त्यांची पूर्व प्रेयसी मेनका (रवीना टंडन) भेटते. मेनकाला भेटताच वीर आपले पूर्वीचे दिवस आठवायला सुरुवात करतो. ते दोघेही लहानपणापासूनचे मित्र असतात. वयात आल्यानंतर ते दोघेही लग्न करण्याचा निर्णय घेतात. मात्र त्यांच्या लग्नाला कल्याणीचा तीव्र विरोध असतो. कारण कल्याणी देवी ही जुन्या विचारसरणीची असते. जात-पात- धर्म तसेच आपल्या रुढी आणि परंपरा यांची ती कट्टर समर्थक असते. त्यामुळे त्यांच्या प्रेमाचे लग्नात रुपांतर होत नाही. परंतु आता वीस ते बावीस वर्षानंतर ते दोघेही भेटल्यानंतर त्यांच्यातील प्रेमाच्या आठवणी पुन्हा जाग्या होतात आणि मग या चित्रपटाच्या कथेला एक वेगळाच ट्विस्ट मिळतो

दिग्दर्शक बिनाॅय गांधीचा हा पहिलाच चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये त्यांनी गुंतागुंतीची प्रेमकथा मांडलेली आहे. या प्रेमकथेला कौटुंबिक नातेसंबंधाची छान जोड दिली आहे. ही कथा हसतखेळत पुढे जाणारी आहे आणि या कथेतील ट्विस्ट आश्चर्यकारक आणि काहीसा धक्का देणारा असाच आहे. कलाकारांची भक्कम फळी या चित्रपटात आहे. अरुणा इराणी, संजय दत्त, रवीना टंडन,पार्थ समथानी, खुशाली कुमार या सगळ्या कलाकारांनी छान अभिनय केला आहे. नव्वदच्या दशकातील संजय दत्त आणि रवीना टंडन ही जोडी पुन्हा या चित्रपटामध्ये एकत्र आली आहे आणि दोघांचीही पडद्यावरील केंमिस्ट्री उत्तम जुळलेली आहे. पार्थ आणि खुशाली यांनीदेखील आपापली जबाबदारी उत्तमरीत्या निभावली आहे.

खुशाली कुमारीने खेळकर आणि खोडकर अशी पंजाबी कुडी देविकाची भूमिका समरसून साकारली आहे. दिल्ली तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोकेशन्स सिनेमॅटोग्राफर्सनी आपल्या कॅमेऱ्यात छान बंदिस्त केली आहेत. पंजाबी मुंडे आणि दिल वासदा हे दोन गाणी गुणगुणावीशी झाली आहेत. मात्र चित्रपटाचा पूर्वार्ध काहीसा संथ झाला आहे. कथानक म्हणावे तशी मनाची पकड घेत नाही. हा सगळा गोंधळ पटकथेचा आहे. परंतु एकूणच चित्रपटाची संकल्पना छान आहे. ही दुहेरी प्रेमकथेची कहाणी आहे आणि त्याचबरोबर कौटुंबिक नातेसंबंध रेखाटणारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.