Honey Irani Javed Akhtar Divorce: लोकप्रिय बॉलिवूड लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी प्रेक्षकांवर आपल्या लेखणीची जादू चालवली. मात्र त्यांचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच चर्चेत राहिलं. जावेद यांनी १९७२ साली हनी इराणी यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या १२ वर्षानंतर त्यांनी १९८४ साली घटस्फोट घेतला. त्यानंतर जावेद यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. मात्र त्यावेळी हनी इराणी दुखावल्या गेल्या होत्या. तर दुसरीकडे शबानावर होम ब्रेकरचा टॅग लागला होता. आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अँग्री यंग मॅन' या डॉक्युमेंट्री सिरीजमध्ये हे तिघेही पहिल्यांदा एकत्र झळकले आहेत. यात त्यांनी त्यांच्या अपयशी लग्नाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
या तीन भागाच्या सीरिजमध्ये जावेद यांनी त्यांच्या लग्नाच्या अपयशासाठी स्वतःला जास्त जबाबदार ठरवलं आहे. याबद्दल बोलताना हनी म्हणाल्या, 'मला असं वाटतं की जे घडायचं होतं ते घडलं. पण एक गोष्ट मी नक्कीच म्हणू शकते की आम्ही अजूनही खूप चांगले मित्र आहोत. मला असं वाटतं की आम्ही आता एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो आहोत. मला जेव्हा कधी गरज असेल तेव्हा ते माझ्या मदतीला धावून येतील आणि त्यांना कधी गरज असेल तेव्हा मी त्यांच्यासाठी धावून जाईन. फरहान आणि झोया ही मुलंसुद्धा सोबत आहेत. त्यांच्यासोबत त्यांनी खूप चांगल्याप्रकारे जुळवून घेतलंय. शबानासुद्धा खूप चांगली आहे. तिच्यामुळे आमचा संसार तुटला असं मी म्हणणार नाही.'
त्यानंतर शबाना यांनीही यावर आपलं मत मांडलं आहे. शबाना याबद्दल बोलताना म्हणाल्या, 'कोणत्याही नात्यात, विशेषकरून त्रिकोणी नात्यात प्रत्येक गोष्ट खूप खासगी आणि वेदनादायी असते. खासकरून जेव्हा त्यात मुलंबाळंही सहभाग असतात तेव्हा ते अधिक त्रासदायक असतं. कारण अशा विषयांवर लोक लगेच त्यांची मतं मांडण्यास मोकळी असतात. ती घर फोडणारी आहे, ती संसार मोडणारी आहे, असा टॅग लोकांकडून मिळतो. अर्थातच मला माझी बाजू स्पष्ट करायची होती. पण जर मी असं केलं असतं तर मी खूप लोकांना दुखावलं असतं. त्यामुळे मौन बाळगण्यातच सर्वांचं भलं आहे असं समजून मी काहीच स्पष्टीकरण दिलं नाही.'
तर मुलांबद्दल बोलताना शबाना यांनी हनी यांचं कौतुक केलं. त्या म्हणाल्या, 'मी हनीला याचं संपूर्ण श्रेय देईन कारण ती तिच्या मुलांना माझ्याविरोधात बरंच काही सांगू शकली असती. पण तिने असं कधीच केलं नाही. उलट त्यांनी मला वाईट सावत्र आई समजू नये म्हणून तिने त्यांना समजावलं होतं. आम्हा दोघींमध्ये खूप चांगलं नातं आहे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.