मराठी चित्रपट आणि टीव्हीच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या घरात रविवारी रात्री चोरी झाली आहे. चोरट्याने स्वप्ना यांच्या सहाव्या मजल्यावरील घरात ड्रेनेज पाईपच्या साहाय्याने प्रवेश केला. मध्यरात्री, सर्वजण झोपलेले असताना, चोर टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये त्यांच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर चढला आणि घराच्या फ्रेंच खिडकीतून घरात प्रवेश केला. त्यांच्या घरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सगळं कैद झालं आहे.
पोलिसांच्या अहवालानुसार, जोशी यांचा अंधेरी पश्चिमेतील सब टीव्ही लेन, साबरी हॉटेलजवळ विंडसर बी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर 3BHK फ्लॅट आहे. 25 ऑगस्ट रोजी पहाटे 3.17 च्या सुमारास फ्रेंच स्लाइडिंग खिडकीतून चोरट्याने स्वप्ना यांच्या घरात प्रवेश केला आणि हॉलमधील पैसे किंवा मौल्यवान वस्तू शोधण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो जोशी यांच्या आईच्या खोलीच्या दिशेने गेला आणि दरवाजा उघडला.
चोरट्याने एका रूमचा दरवाजा थोडासा उघडून बेडरूममध्ये जाण्याचा प्रयत्न केला, जोशी यांच्या आई बेडवर झोपल्या होत्या आणि केअरटेकर जमिनीवर झोपला होता. नंतर, त्याने दुसऱ्या बेडरूममध्ये पाहिलं, परंतु तेथे एक कुत्रा असल्यामुळे तो आत जाऊ शकला नाही. म्हणून, तो स्वयंपाकघरात गेला आणि नंतर मंदिराच्या खोलीत शोधू लागला.
त्यानंतर तो चोर जोशी यांची मुलगी सौमिता हिच्या खोलीत गेला, जिथे ती आणि तिचा पती झोपले होते. चोरट्याने त्या खोलीत प्रवेश करून सौमिताच्या पर्समधील ६ हजार रुपये चोरून नेले. पहाटे 3.10 ते 3.30 च्या दरम्यान ही घटना घडली.
पहाटे साडेतीन वाजता त्यांच्या पाळीव मांजरीने जोशी यांचे जावई देवन यांना उठवलं. देवन हे पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेले असताना त्यांना संशय आला म्हणून ते पुन्हा हॉलमध्ये आले. त्यांनी चोराला पाहिलं. त्याचा पाठलाग केला, मात्र काही सेकंदात चोर खिडकीतून पळून जाण्यात यशस्वी झाला. चोर निशस्त्र होता. ही संपूर्ण घटना जोशी यांच्या घरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
स्वप्ना वाघमारे या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शिका आहेत. त्या 'रंग बदलती ओढणी' आणि 'दमदम' यासाठी ओळखल्या जातात. त्यांनी 'कहना है कुछ ', 'कुटुंब', 'कर्म' या मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. तर 'देवयानी' या मालिकेची निर्मिती त्यांनी केली होती.
या घटनेनंतर जोशी यांनी आंबोली पोलिसात तक्रार दाखल केली. जोशी यांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवली. आंबोली पोलिसांनी भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 305 (चोरी), 331(3) आणि 331(4) (जबरदस्तीने प्रवेश करणे किंवा घर तोडणे) अंतर्गत 26 ऑगस्ट रोजी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.