मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टी गाजवणारे लोकप्रिय अभिनेते मोहन गोखले यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. अभिनयासोबतच चाहते त्यांच्या देखणेपणावर फिदा होते. मात्र हा देखणा, हरहुन्नरी कलाकार चित्रपटसृष्टीने गमावला. 'हे राम' चित्रपटावेळी त्यांचं निधन झालं. आज त्यांचा स्मृतिदिन. यानिमित्ताने त्यांच्या पत्नी शुभांगी गोखले यांनी त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. त्यांनी उषा नाईक यांच्याबद्दलची एक आठवण सांगितलीये. जेव्हा उषा यांना दुसऱ्या अभिनेत्रीने बाहेर काढलं होतं तेव्हा मोहन यांनी त्यांना मदत केलेली.
शुभांगी यांनी उषा नाईक यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करत लिहिलं, 'तारीख,महिना,वर्षं या सगळ्या भूतलावरच्या गोष्टी ७ नोव्हेंबर। मोहनचा वाढदिवस… त्याच्या आत्ताच्या दूरच्या गावी नोव्हेंबरची ७ तारीखबिरीख नसेलही…🦋.. पण एक चक्कर मारून गेला बहुधा! कारण नोव्हेंबरमध्ये मी एक टेलिफ़िल्म केली, न् सध्या एका आगामी प्रोजेक्टवर काम चालू आहे..गाठीभेटी इ. टेलिफिल्ममध्ये उषाताई होत्या उषा नाईक. मोहनच्या पहिल्या पिक्चरची हिरॉईन🙂बन्याबापू! सुपरहिट सिनेमा.. गाणी त्याहून सुपरहिट! खूप गप्पा,आठवणी. उषाताईंनी सांगीतलं त्या पिक्चरच्या शूटींगचा पहिला दिवस. कोल्हापुरातला स्टुडिओ. दोन जोड्या होत्या.एक मेकपरूम हिरोईन्सची, एक मेकपरूम हिरोंची.. बाळकाका( कर्वे) न् मोहनराव( गोखले) स्टुडिओचा फेरफटका मारत होते..त्यांना झाडाखाली आपलं सामान घेऊन मुसमुसत बसलेल्या उषाताई दिसल्या.'
त्यांनी पुढे लिहिलं, ' त्यांना दुसऱ्या हिरोईनने मेकपरूम मधून बाहेर काढलं होतं. “ कालची पोरगी माझ्या रूममध्ये? चालणार नाही”असं म्हणून. उषाताई म्हणाल्या 'मोहननी त्याक्षणी माझी बॅग उचलून त्यांच्या रूम मध्ये नेलं. तू इथे कर तुझा मेकप वगैरे..तुला कपडे बदलायचे असतील तेव्हा आम्ही जाऊ बाहेर'. 'तो पिक्चर पूर्ण होईपर्यंत मला त्यांची रूम दिली बघ”.' यासोबतच त्यांनी आणखी एक आठवण सांगत लिहिलं, 'गेला आठवडाभर एका कामाची पूर्वतयारी चालू आहे, नीनाताई (कुळकर्णी)बरोबर! 'सावित्री' नाटकाच्या आठवणी निघाल्या..मोहनचं काम.. इतर काम याबद्दल फार प्रेमानी बोलत होती नीना ताई पण एक आठवण मला त्यात काम केलेल्या अमिता खोपकरनी सांगीतलीये. तेव्हाचे दौरे मोठे आणि बाकीच्या सोयी म्हणजे नावालाच सोयी. गावातलं सगळ्यात कळकट, गैरसोयींचं लॉज असायचं. अशाच एका दौ-यात कुठल्यातरी आडगावात ही मंडळी पहाटे लॉजला पोंचली.'
त्यांनी पुढे लिहिलं, 'कधीही कोसळून पडेल असं ते लॉज होतं. अर्धवट झोपेत मॅनेजरने नेमून दिलेल्या रूमच्या किल्ल्या घेण्यासाठी ताटकळलेले सगळे. मोहन एक किल्ली उचलून भराभर जिना चढून गेला आणि वरून जोरात वेटरला हाका मारून म्हणे, अरे इथला एसी आणि टीव्हीचा रिमोट दे बघू, कार्पेट ओलं झालंय ते बदल जरा'. बायकांमध्ये जो काही खडबडाट झाला, त्याला सुपर डीलक्स रूम दिलीय, खूप गदारोळ झाला. मॅनेजर एकीकडे त्यांना शांत करत होता आणि मोठ्यानी वरच्या मजल्यावरच्या मोहनला” गप ना मोहन्या, xxxxxx! ओरडत होता!!! त्या लॉजला धड दारही नव्हतं..तिथे हे सगळं का असेल, असा छळायचा मोहन.. तर आपण काही करायचं नाही आठवणी आपोआप तरंगत आसपास येतातच!'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.