महाराष्ट्रात सध्या निवडणुकीमुळे वातावरण बरंच तापलेलं आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. विधानसभा निवडणुकीची तारीख जशी जशी जवळ येतेय तसा प्रचाराला आणखी रंग चढतोय. अशातच निवडणुकीच्या काळात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ आहे अभिनेते नाना पाटेकर यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा. या मुलाखतीत नाना तुम्ही पुन्हा पुन्हा भ्रष्ट नेत्यांनाच तिकीट का देता असा प्रश्न विचारताना दिसतायत. त्यावर फडणवीस यांनी दिलेलं उत्तरही ऐकण्यासारखं आहे.
हा व्हिडिओ २०२२ झालेल्या एका मुलाखतीमधला आहे जी लोकमत तर्फे घेण्यात आली होती. यात नाना हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारतात की, यशवंतराव चव्हाण गेले तेव्हा त्यांच्या खात्यावर २५ हजार रुपयेही नव्हते. साधा आपला नगरसेवक निवडून आला तर पुढच्यावर्षी तो कोट्याधीश असतो. त्याची चौकशी का नाही होत? म्हणजे मला कळतं की हा भ्रष्ट आहे मग तुमच्या का नाही लक्षात येत? त्याच्यावर कारवाई का नाही होत? मी १०० रुपये आल्यानंतर ३० रुपये टॅक्स भरतो. १८ रुपये जीएसटी घेता. तरीही आमच्यावर कारवाई होते. तुमच्या नेत्यांवर का होत नाही?'
यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, 'भ्रष्टाचार ही राजकारणच नाही तर आपल्या व्यवस्थेला लागलेली कीड आहे. दुर्दैवाने ही संपवायची असेल तर खूप सामूहिक प्रयत्न करावे लागतील. याचं कारण असं की आपण बघा भ्रष्टाचार केला म्हणून जेलमध्ये जाऊन आलेले, अनेक प्रकरणांमध्ये अडकलेले, असे लोकं थंपिंग मेजॉरिटीने जिंकून येतात. त्यांना लोकं वारंवार निवडून पाठवतात. जोपर्यंत समाज चांगल्याला चांगलं म्हणणार नाही आणि वाईटाला वाईट म्हणणार नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही.'
ते पुढे म्हणाले, 'म्हणून मला असं वाटतं की एक सामूहिक प्रयत्न आपल्या सगळ्यांना करायला पाहिजे. मला अनेक लोक विचारतात की का हो इतके गुन्हे आणि कसं तुम्ही त्यांना तिकीट देता. मी म्हणतो की बाबा त्याच्यावर गुणेच आहेत पण तोच निवडून येतो. आणि दुसऱ्याला चांगला साळसूद, सुंदर स्वच्छ, टिकावू त्याला उभं केलं तर डिपॉझिट चाललं त्याचं. राजकीय नेते हे केवळ बदलू शकत नाहीत. समाजाने प्रयत्न केले पाहिजेत. आणि फक्त समाजाला वाटून चालणार नाही. हे परिवर्तन झालं पाहिजे असं नेत्यांना देखील वाटलं पाहिजे.' निवडणुकीच्या अनुषंगाने हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.