मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेला प्रसाद ओक 'धर्मवीर २' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याने आनंद दिघे यांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. या शिवाय त्याचा 'महापरिनिर्वाण' हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रसादने २०२४ मध्ये मुंबईत स्वतःच्या हक्काचं घर घेतलं. त्याचा अभिनयातील प्रवास खूप खडतर होता. या प्रवासात त्याला त्याच्या मंजिरीची खंबीर साथ लाभली. त्यामुळे त्याने लग्नाच्या तब्बल २५ वर्षांनी तिच्यासाठी मुंबईत घर घेतलं. त्याने थाटामाटात पूजाही केली. मात्र प्रसादला हे घर शासकीय कोट्यातून मिळालं असं काहींनी म्हटलं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने अशा लोकांना उत्तर दिलं आहे.
प्रसादने नुकतीच लेट्स अप मराठी या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना प्रसाद म्हणाला, '१९९७-९८ साली मी मंजूला पुण्याहून एशियाडने पहिल्यांदा मुंबईत घेऊन आलो होतो. दादरला आम्ही उतरलो. तेव्हा ती मला म्हणाली की आता आपण अंधेरीला जायचं का? तिला अंधेरीचं प्रचंड आकर्षण होतं. कारण, बरेच सेलिब्रिटी याच भागात राहतात हे पेपरमध्ये वाचलेलं होतं. तेव्हा मी तिला सांगितलं की नाही आपण बोरीवलीला जात आहोत. आम्ही कांदिवलीमध्ये २३ वर्ष राहत होतो. मुलांचं शिक्षण वगैरे सांभाळून आम्ही थोडी थोडी बचत करत होतो. मंजूचं ते स्वप्न पूर्ण करायचंच होतं. मागच्या वर्षी आमच्या लग्नाला २५ वर्ष झाली. मग म्हटलं यावर्षी हे गिफ्ट नाही द्यायचं तर मग कधी देणार?'
तो पुढे म्हणाला, 'लोकांना असं वाटतं की याला घर असंच मिळालं आहे. पण, ते तसं नाही. भयंकर खस्ता खाऊन, रक्ताचं पाणी करून हे घर झालेलं आहे. हे घर असंच कोणीही दिलेलं नाही. किंवा शासकीय कोट्यातून मिळालेलं नाही. हा लोकांचा गैरसमज आहे. पण, हे मी स्वत:च्या हक्काने, कुणाचंही लांगुलचालन न करता मिळवलेलं घर आहे. ते तिचं स्वप्न होतं. तिला हवं तसं घर आम्हाला बरोबर त्याच वेळेला मिळालं. मला असं वाटतं की या सगळ्यासाठी डॉ. लागू, निळूभाऊ, राजा गोसावी, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, दिघे साहेब या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत.' प्रसाद सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसतोय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.