प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला ‘पाणी’ हा चित्रपट १८ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला आला. मराठवाड्यातील भीषण पाणीटंचाई समस्या आणि या समस्येला सामोरे जाणाऱ्या एका तरुणाच्या संघर्षावर आधारित या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मात्र जेव्हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहायची वेळ आली तेव्हा मात्र प्रेक्षकांनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या तोंडाला पानं पुसली. गावातील पाणीटंचाईमुळे अनेक कुटुंबं स्थलांतरित झाली असताना, हनुमंत आपल्या गावासाठी काहीतरी बदल घडवण्यासाठी प्रचंड मेहनत करतो आणि गावात पाणी आणतो. अत्यंत सुंदर अशी पटकथा, कलाकार असलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मात्र थंड प्रतिसाद मिळत आहे.
'पाणी' या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाकडून सगळ्यांनाच खूप आशा होती. मात्र या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. sacnilk या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने ३ दिवसात केवळ १७ लाखांचा गल्ला जमवलाय. हीच परिस्थिती एक आठवड्या आधी प्रदर्शित झालेल्या 'फुलवंती' आणि 'येक नंबर' ची आहे. 'फुलवंती' ने आतापर्यंत ३ कोटींचा टप्पा गाठला आहे तर 'येक नंबर' ने २ कोटींची कमाई केलीये. हे आकडे अशा उत्कृष्ट चित्रपटांसाठी अतिशय निराशाजनक आहेत.
एकीकडे मराठी प्रेक्षक दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या नावाने खडे फोडत असतात. मराठीत चांगले चित्रपट बनतच नाहीत असं म्हणत मराठी सिनेसृष्टीला दोष देत असतात. मात्र दुसरीकडे निर्माते प्रेक्षकांना 'फुलवंती', 'येक नंबर', 'पाणी', 'लाइक अँड सबस्क्राइब' सारखे उत्कृष्ट सिनेमे देत असतानाही प्रेक्षक केवळ सोशल मीडियावर या चित्रपटांना पाठिंबा देण्यात धन्यता मानतात. एकीकडे स्वतःच्या भाषेतील चांगल्या चित्रपटांना पाहण्यासाठी प्रेक्षकगृहात पायही न ठेवणारे हेच प्रेक्षक दुसरीकडे साऊथ आणि बॉलिवूड सिनेमांचे गोडवे गात ते चित्रपट पाहण्यासाठी रांगा लावताना दिसतात. यात कितीही टुकार सिनेमा असला तरी वेळ घालवण्यासाठी हिंदी चित्रपटाची निवड करताना दिसतात. ही गोष्ट दक्षिणेकडे घडताना दिसत नाही.
मराठी सिनेमे हे आशयघन असतात. विषयाची मांडणी आणि कलाकारांचं तो सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना जास्त महत्त्वाचं वाटतं. मराठी सिनेमाची स्वतःची वेगळी शैली आहे. या वर्षभरात आलेल्या 'ओले आले' ,'घरत गणपती', 'जुनं फर्निचर' यासारख्या चित्रपटांचीही काही फारशी वेगळी अस्वस्था नव्हती. आता मराठी सिनेमांची ही अवस्था होणं यात चूक निर्माते किंवा दिग्दर्शकांची नसून सर्वस्वी प्रेक्षकांची आहे असं म्हंटलं तरी काही वावगं ठरणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.