मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री सविता मालपेकर यांनी अनेक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यांनी अनेक भूमिका अगदी चोख पार पाडल्या. मात्र मध्यंतरी एका मालिकेच्या दरम्यान सविता चर्चेत होत्या. ती मालिका होती 'मुलगी झाली हो'. या मालिकेतून अभिनेते किरण माने यांना तडकाफडकी काढण्यात आल्याचं अभिनेत्याने म्हटलं होतं. मात्र आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत किरणला चॅनेलने अचानक काढलं नव्हतं असं सविता यांनी सांगितलंय. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सविता यांनी नेमकं काय घडलेलं ते सांगितलंय.
या मुलाखतीत बोलताना सविता म्हणाल्या, 'तो चांगला मुलगा आहे. हल्ली काय झालंय मला कळत नाही. चांगली असणारी माणसं पण अशी का वागतात मला कळत नाही. काय त्यांच्या डोक्यात किडा जातो तो शोधायचाय मला. माझ्यामुळे ही मालिका चालू आहे हे त्याचं होतं. तो बोलत नसला तरी, बघ कसं आहे माणूस असं तोंडाने बऱ्याच गोष्टी बोलत नाही पण कृतीतून आणि शारीरिक हावभावातून ते दाखवत राहतो. त्याचा त्रास जास्त होतो. सुरुवातीला तो म्हणालाही की सविता ताई तू असलीस की सिरीयल हिट होते. मी त्याला म्हणालेसुद्धा की हे बघ किरण्या, चांगली मालिका आहे, चांगलं काम करूया. मी प्रत्येक मालिकेच्या वेळेला प्रत्येक कलाकाराशी बोलते. पण कसं आहे आपण माणूस आहोत. आपल्याकडून चुका होणार पण त्या मान्य करण्याची तयारी असली पाहिजे. सॉरी म्हणण्याची तयारी असली पाहिजे.'
त्या पुढे म्हणाल्या, 'ज्या सेटवर आपण वादविवाद करतोय ते सेटच्या गेटच्या बाहेर जाता कामा नये. जर उद्या तुला कुणी सांगितलं की मी तुझ्या पाठीमागे असं बोलते. तुझ्यात हिंमत पाहिजे समोर येऊन विचारायची. माझं म्हणणं काय होतं, तू बोलत होतास हे खरं. चॅनेलने तुला न सांगता काढलेलं नाही. चॅनेलने त्याला चार वेळा वॉर्निंग दिलेली. बरं त्याला कुठल्या कारणासाठी काढलं ते कारण मला आजही कळलेलं नाहीये. मी ताराराणीचं शूटिंग करत होते आणि तिथे मला कळलं की किरणला काढलं. त्याच्याआधी आमचे लग्नाचे सीनवगरे झाले तेव्हा मिटिंग झालेली. तेव्हा ज्यांच्या बद्दल बोललेला त्यांची माफी मागितलेली तेव्हा आपसात मिटलेलं.'
सविता पुढे म्हणाल्या, 'ते झाल्यानंतर लगेच का काढलं ते कळेना. त्याने काय केलं, चुकला तो. पण हे त्याला मान्य आहे की नाही ते मला ठाऊक नाही. कारण तसे आम्ही भेटलोच नाही. पण कलाकार प्रोडक्शन हे आपापसातल्या भानगडी असतात. हे राजकारणी लोकांपर्यंत नेण्यापर्यंत काही झालेलं नव्हतं. आणि किरण तिथे चुकला. हे किरणने स्वतःहून केलेलं नाही. किरणच्या पाठीमागे एक शक्ती होती आणि तिच्यामुळे तो राजकारण्यांपर्यंत गेला असं माझं ठाम मत आहे. तो जाता येता टोमणे मारून बोलायचा मी कधी लक्ष दिलं नाही पण टाळी कधी एका हाताने वाजत नाही. ज्यांच्यामुळे किरणसोबत असं घडलं त्यांच्याही चुका असतीलच की.'
निर्मातीबद्दल बोलताना सविता म्हणाल्या, 'आमची निर्माती अतिशय गरीब होती स्वभावाने. या सगळ्यामुळे तिला त्रास होत होता. मी तिथे सगळ्यात मोठी होते. त्यामुळे तिला त्रास झाला तर तो मला पाहवला गेला नाही. एकदा तो डिरेक्टरच्या अंगावर गेला. मी किरणला सांगायचे थांब. आता हे झालं परत काहीतरी, परत दोन दिवसांनी काहीतरी. बरं यात नुकसान कुणाचं झालं असतं? एकट्या किरण मानेचं का? नाही युनिटमधल्या १०० माणसांचंही नुकसान झालं असतं. त्यांची घरं कोण पोसणार? जर दिसतंय तर बोलायला पाहिजे. मी त्यांच्य बाजूने बोलले म्हणून त्याला वाईट वाटलं. कारण आमचं तसं काही भांडण नव्हतं. वाद हा तेवढ्यापुरता असला पाहिजे.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.