अनेक मराठी मालिका, नाटकं आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनी कधी प्रेमळ तर कधी खाष्ट भूमिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांनी फार कमी वयात अभिनयाची सुरूवात केली. अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना मराठी सिनेसृष्टीतील अबक शिकायला मदत केली. अशा हरहुन्नरी अभिनेत्या सविता मालपेकर आजही अनेक मालिकांमध्ये दिसतात. त्यांनी अभिनयातील एका पिढीसोबत काम केलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळेच जेव्हा त्यांनी 'डॉ. काशिनाथ घाणेकर' हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांना प्रचंड वाईट वाटलं. डॉक्टरांसोबत काम केलेल्या सविता यांना हा चित्रपट मुळीच पटला नव्हता.
सविता यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी या चित्रपटात डॉक्टरांबद्दल चुकीचं दाखवण्यात आलंय असं म्हटलं. चित्रपटाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, 'डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमा आला. आज आशालता नाहीये पण तिने डॉक्टरांबरोबर खूप काम केलं. ती माझ्याकडे येऊन रडली जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला. ती म्हणाली सविता आपण हा सिनेमा बघायचा नाही. गेलीस तर बघ. मी विचारलं काय झालं. ती म्हणाली, डॉक्टर असे होते? या चित्रपटात डॉक्टरांबद्दल पहिलंच वाक्य बोललं गेलंय ते इतकं चुकीचं होतं ते असं की डॉ. काशिनाथ घाणेकर मराठी रंगभूमीला लागलेली कीड आहे असं वाक्य आहे.'
पुढे सविता म्हणाल्या, 'मला बघायचा नव्हता तो सिनेमा पण मी एका ठिकाणी परीक्षक होते म्हणून मला तो बघायला लागला. पण मी अभिजित देशपांडेना सांगितलं की हे नाही आवडलं. फार चुकीचं तुम्ही दाखवलंय. पहिली गोष्ट म्हणजे त्यावेळेला सुद्धा कुणीही रस्त्यावर बसून दारू प्यायचे नाहीत. शौकीन होते डॉक्टर पण ते त्यांच्या घरात. ते कधीच रस्त्यावर दारू प्यायले नाहीत. म्हणजे जेवढं मी त्यांच्याबरोबर काम केलंय तर मला नाही कधी अनुभव आला की त्यांनी चिमटा काढलाय वगरे.'
त्यांनी एक प्रसंग सांगितला. त्या म्हणाल्या, 'ऐकणं आणि अनुभवणं खूप फरक असतो. अनुभवल्याशिवाय कुणाबद्दल बोलू नये. एकदा आमचं एक नाटक होतं. रिहर्सल केली आणि त्यानंतर हिल घालताना माझा पाय मुरगळला. आता काय करायचं. मी रडायला लागले. डॉक्टर होते तिथे त्यांनी लगेच बर्फ मागवला. माझा पाय हातात घेऊन त्यावर बर्फ लावला. लगेच लेप लिहून दिला. सांगितलं असा असा लाव. बरं वाटेल. मग लहान असो किंवा मोठं माणूस प्रत्येक व्यक्तीशी वागताना तसाच वागतो. प्रत्येकाशी वेगळं वागणं कसं जमेल. अशा माणसाबद्दल चित्रपटात चुकीचं दाखवलं गेलं.' सविता सध्या झी मराठीवरील 'शिवा' या मालिकेत आजीच्या भूमिकेत दिसत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.