आपल्याला रामदासांबद्दल काहीच माहिती नाही तरीही... समर्थांच्या कार्याबद्दल विक्रम गायकवाड स्पष्टच म्हणाला

Vikram Gaikwad On Raghuveer: आपल्याला समर्थांविषयी जे काही माहिती आहे ती फक्त एक किंवा दोन टक्का आहे, असं विक्रम गायकवाड नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.
Vikram Gaikwad
Vikram Gaikwad esakal
Updated on

समर्थ रामदास स्वामींचं जीवनचरित्र आता 'रघुवीर' या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर आलं आहे. हा चित्रपट प्रभू श्रीराम भक्त आणि समर्थ रामदास स्वामींच्या अनुयायांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. २३ ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये अभिनेते विक्रम गायकवाड याने समर्थ रामदास स्वामी यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत विक्रमने आपल्याला रामदासांच्या कार्याबद्दल काहीच ठाऊक नाही असं म्हटलं आहे.

सकाळला दिलेल्या मुलाखतीत विक्रम म्हणाला, 'आपल्याला समर्थांविषयी जे काही माहिती आहे ती फक्त एक किंवा दोन टक्का आहे. म्हणजे आपल्याला मनाचे श्लोक माहिती आहेत आणि समर्थ सज्जनगडावर राहत होते; पण त्यांचा जन्म कुठे झाला आणि त्यांनी शेवटचा श्वास कुठे घेतला याविषयी मी जेव्हा माहिती करून घेतली तेव्हा लक्षात आलं की या व्यक्तीचा उद्देश काय होता, हे सगळं करण्यामागे. कारण ७२ वर्षांचे समर्थांचे आयुष्य आहे. एवढ्या काळात अकाराशे मठांची स्थापना केली. हे आजच्या विकसित काळातदेखील कोणाला शक्य नाही आहे.

कारण त्या काळी तर दळणवळणाचीदेखील कोणती साधने नसायची. कोणाशी संपर्क करणेदेखील अवघड होते; तरीही ७२ वर्षांच्या काळात एवढा मोठा पल्ला गाठणं म्हणजे आपण फक्त विचार करू शकतो की त्यांनी एक वर्षात किती मठांची स्थापना केली असेल. या पात्रामुळे मला त्यांचा तो प्रवास जवळून अनुभवता आला आणि मला खूप छान वाटलं. मला असं वाटतं की, आपण संतांना देव करायला जातो. संत हे तत्कालीन समाजाचे प्रबोधन करण्यासाठी, त्या काळात काय कमी आहे आणि काय केल्याने आपला समाज उन्नत होणार आहे, हे त्यांना कळत असतं म्हणून ते संतत्वाला जातात. यासाठी प्रत्येक वेळी त्यांना देव दिसण्याची गरज नसते; पण आपल्याकडे ती एक पद्धत असते.

जर खरोखर समर्थांना देवाविषयीच सांगायचं असतं तर त्यांनी पूर्ण काळ फक्त देवाबद्दलच सांगितलं असतं. मनाचे श्लोक आणि त्यांचं महत्त्व नसतं पटवून दिलं. समर्थांना माहिती होतं की, त्या काळात कोणत्या गोष्टींची गरज आहे, तरुणांनी मनोपासना करण्याची का गरज आहे, हे सगळंच त्यांना जाणवत होतं. भित्र मन देवाचं संरक्षण नाही करू शकत, असं त्यांचं ठाम मत होतं. ते म्हणायचे देव तुमचं रक्षण करायला नाही येणार, तुम्हालाच देवाचं संरक्षण करायचं आहे आणि यासाठी मनाची शक्ती खूप गरजेची आहे आणि म्हणूनच त्यांनी मनाची आणि शरीराची शक्ती वाढवण यावर संपूर्ण आयुष्यभर भर दिला.

या भूमिकेविषयी अधिक सांगायचं तर जेव्हा हे काम माझ्याकडे आलं तेव्हा खरंच खूप भीती वाटली. कारण मला असं वाटत होतं की मी तसा नाही दिसणार. मुळात माझं व्यक्तिमत्व वेगळं आहे आणि समर्थांचे आपण जे फोटो पाहिलेत ते खूप वेगळे आहेत. समर्थ एक भारदस्त आणि ह्युज पर्सनॅलिटी आहे. तसा मी दिसेन की नाही, याची शंका होती; पण आमच्या दिग्दर्शक नीलेश कुंजीरने जेव्हा मला माझ्याच एका फोटोवर स्केच करून मी असंही दिसू शकतो, हे दाखवले तेव्हा मला एक अंदाज आला, की आपण ॲटलिस्ट तसे दिसू शकतो.

आता पुढचं काम आपलं आहे की त्या भूमिकेसाठी घ्यावे लागणारे परिश्रम. यासाठी मला शारीरिक मेहनत खूप घ्यावी लागली. मी व्यायामावर भर दिला. सोबतच भाषेचा तसा मला त्रास नाही झाला. कारण मी यापूर्वीदेखील या काळातल्या भूमिका केल्या आहेत. त्यामुळे ते काम सोपं झालं. मनाचे श्लोक तर शाळेत असल्यापासून कानावर पडायचे; पण मधे मधे आम्ही काही हिंदी प्रसंगदेखील शूट केले आहेत, त्या वेळी वेगळी भाषा आणि त्यावर थोडी मेहनत घ्यावी लागली.

या चित्रपटात समर्थांनी केलेलं कार्य दाखवले आहे. त्यांचा महिमा असा नाही दाखवला आहे. त्यांचा जीवनप्रवास दाखविला आहे. त्या काळी त्यांना नेमकी कसली ओढ होती, जसं की रामदास स्वामींना श्रीरामाची प्रचंड ओढ होती; पण त्यांनी मंदिराची स्थापना केली ती सगळी हनुमानाची केली. यामागची दोन कारणं होती. ते रामाचे भक्त होते; पण ते स्वतःला हनुमान समजायचे आणि इतरांना बलोपासना करायला शिकवायचे. त्यामुळे नुसताच महिमा नाही सांगितला. तर त्यांच्या प्रत्येक कार्यामागचा विचार सांगितला आहे.

या भूमिकेने मला खूप काही शिकवले; पण मला असं वाटतं की एखादा कलाकार याबद्दलची अमुक गोष्ट पॉइंटआउट नाही करू शकत की, मला हे शिकता आलं, ते शिकता आलं; पण तुम्ही जेव्हा दोन किंवा तीन महिने ती भूमिका साकारीत असता, तर त्या पूर्वीचे काही महिने आपण सदर भूमिकेचा अभ्यास करीत असतो. तेव्हा हळूहळू आपल्यात त्या पात्राचे गुण आपोआपच उतरतात. ही भूमिका करताना मला तो प्रवास प्रत्यक्ष सीन करण्यापेक्षा अधिक आव्हानात्मक वाटला.

Vikram Gaikwad
Savaniee Ravindra: संसार, करिअरच्या धावपळीत सावनी रविंद्रची आणखी एक झेप; सुरू केला पहिला संगीत पॉडकास्ट शो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.