"अग ए बाई जरा हळू चाल.... जरा सावकाश! तू पोटूशी आहेस, हे विसरली आहेस का?.. या अवस्थेत अशी घाई बरी नव्हे, पोटात एक जीव वाढतोय त्याचा विचार कर जरा, आता तू एकटी नाहीस, दोन जीवांची आहेस," अंजलीच्या सासूबाई तिची शाळाच घेत होत्या.
या सूचना झाल्यानंतर तिने सोफ्यावर पाठ टेकली आणि टीव्हीचा रिमोट हाती घेऊन ऑलिम्पिक स्पर्धेचे चॅनेल लावले. तलवारबाजीची मॅच सुरू होती.. महिला खेळाडू एकेक गुण घेण्यासाठी एकमेकांवर वेगाने तलवार चालवत होत्या. बचाव करण्यासाठी चपळाईने सळसळणाऱ्या त्या दोघी अंजलीला टीव्हीवरुन नजर हलवू देत नव्हत्या. मॅच संपली अन् जिंकलेल्या महिला खेळाडूने जाहीर केले की, I'm a seven month pregnant!
हे ऐकून अंजली उडालीच. थोड्यावेळापूर्वी तिला आपल्या घरच्यांनी केलेल्या सूचना आठवल्या. या तलवारबाज महिलेल्या तिच्या घरच्यांनी केल्या नसावेत का? की तिने कोणाला याबाबत काही सांगितलेच नाही, पण हे कसं शक्य आहे? त्या खेळाडूच अंजलीला अप्रूप वाटलं, पण दुसऱ्याच क्षणी प्रश्न आला की ही हिला होणाऱ्या बाळाची काळजी आहे की नाही? एखाद वर्ष खेळली नसती तर चाललं नसतं का? त्या खेळाडूचं कौतुक करावं की मूर्खपणा म्हणावं?
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून एक गोष्ट समोर आली. फेन्सींग अर्थात तलवारबाजीत इजिप्तची खेळाडू नदा हाफेज ( Nada Hafez) ही सात महिन्यांची गर्भवती असूनही स्पर्धेत खेळली आणि जिंकली. तिच्या मॅचपेक्षा गर्भवती असल्याची चर्चा अधिक रंगली.
२६ वर्षीय नदाने या लढतीनंतर इंस्टाग्रामवर ही आनंदाची बातमी दिली, तुम्हाला जरी तलवारबाजीच्या सामन्यात दोन खेळाडू जरी दिसत असले, तरी प्रत्यक्षात तिथे आम्ही तिघं आहोत. मी, माझी स्पर्धक आणि या जगात येऊ पाहणारं माझं बाळ!
माझं बाळ आणि मी एक समान आव्हानांचा सामना करत आहोत, मग ते शारीरिक असो किंवा भावनिक. गरोदरपणाचा रोलरकोस्टर कठीम असतो, परंतु वैयक्तिक आयुष्य आणि खेळ यांच्यातला समतोल राखण्यासाठी संघर्ष करावा लागतो. पण, हा संघर्ष एक सुखद आनंदासाठीचा आहे.
अशा या अवस्थेत मी उप उपांत्यपूर्व फेरीत स्वतःची जागा पक्की केली याचा मला अभिमान वाटतोय आणि हे सांगण्यासाठी मी ही पोस्ट लिहित आहे.
या खडतर आणि तितक्याच महत्त्वाच्या निर्णयात माझ्या मागे उभा राहणारा पती व कुटुंब मला मिळालं यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते...
हा ऑलिम्पिक खूप वेगळा आहे... तीन वेळची ऑलिम्पियन यावेळी एका छोट्या ऑलिम्पियनसोबत खेळतेय..