आई ओरडून उठवते आणि शाळेत पाठवते! राज्यपालांच्या सूचनेवर मुलांना आणि पालकांना काय वाटते?

मुलांची झोप व्यवस्थित व्हावी यासाठी शाळेच्या वेळा बदलण्याचा विचार
school kid
school kidSakal
Updated on

पुणे - सकाळी सकाळी ओरडून मम्मी मला उठवते आणि शाळेत पाठवते. शाळेत पण खूप झोप येते.. पण शाळेतून आलं की क्लासला जायला लागतं, क्लासमध्ये पण खूप झोप येते..

क्लासवरून आलं की मम्मी परत अभ्यासाला बसवते.. मला खेळायला पण वेळ मिळत नाही.. पाचवीत असणाऱ्या श्रवणला भिसे ला जेव्हा विचारण्यात आलं की तुला सकाळची शाळा आवडते का? तेव्हा त्याने नाही असे उत्तर दिले..

मुलांची झोप व्यवस्थित व्हावी यासाठी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी काही दिवसांपूर्वी शाळेच्या वेळा बदलण्याचा विचार व्हावा असे सुचविले. याआधी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी देखील २०२२ मध्ये शाळांच्या वेळा बदलण्याचा शासन विचार करत असल्याबत सांगितले होते.

या एकूणच प्रकरणात विद्यार्थी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्याचं मत सर्वाधिक महत्वाचं आहे. पण विद्यार्थ्यांच्या शाळांच्या वेळांबाबत विद्यार्थी हा एकमेव घटक नाही.

या भोवती पालक, शिक्षक, शाळा प्रशासन, व्हॅन काका, रस्त्यावरचे ट्राफिक, एकाच इमारतीत वेगवेगळ्या वेळात भरणाऱ्या शाळा हे सर्व घटक आहेत. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना सर्व घटकांचा विचार होणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

मला सकाळची शाळा आवडत नाही..

श्रवण सकाळी आठ वाजता घरातून शाळेसाठी बाहेर पडतो. तो दुपारी तीन वाजता शाळेतून घरी येतो. चार वाजता त्याचा क्लास असतो. तिथून तो सहा साडेसहा वाजता घरी येतो. मग थोड्या वेळाने तो पुन्हा अभ्यासाला बसतो.. या सगळ्यात तो झोपताना मात्र दिसत नाही.. म्हणूनच तो म्हणतो मला सकाळची शाळा आवडत नाही..

मुलांनी आई वडिलांसोबत वेळ घालवणे गरजेचे..

लातूर येथील जिल्हा परिषद शाळेतील अमोल कांबळे म्हणाले, बालमानसशास्त्राचा विचार करता व विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता राज्यपालांचा हा विचार खूपच महत्वाचा वाटतो. सकाळी शाळा झाली की दुपारी खासगी क्लासेस असतातच.

औपचारिक शिक्षणाच्या हट्टापायी अनौपचारिक शिक्षणाकडे दुर्लक्ष होते आहे. सर्वांगीण विकासासाठी मुलांनी आई वडिलांसोबत वेळ घालवणे गरजेचे आहे. त्यासाठी शाळेच्या वेळा बदलणे, शाळांचे तास कमी करणे असे उपाय केले गेले तर फायदा होऊ शकेल.

school kid
Child Care : मोबाईलचे रील नको आजी-आजोबांच्या गोष्टीच हव्या ; नातवंडांना सुरक्षित सहवास

१ ते ४ वर्गातील शाळा थोडी उशिराच हवी..

कोल्हापूर येथील दीपाली मगदूम म्हणाल्या, माझी मुलगी आठवीला आहे. तीची शाळा सकाळी आठ वाजता भरते. शाळा जवळ असल्याने ती सात वाजता उठते. पण मला असं कुठेही वाटत नाही की तिची झोप पूर्ण झालेली नाही. पण जेव्हा ती जेव्हा थोडी लांब आजीकडे राहायला होती तेव्हा तिला सकाळी सहा वाजता उठायला लागायचे.

मुलांची झोप पूर्ण झाली नाही तर त्यांचे वर्गात लक्ष लागत नाही, हा अनुभव मला यावेळी आला होता. पालकांनाही त्यांना एवढ्या सकाळी काय खायला द्यायचे हा प्रश्न असतो.

त्यात दुपारी शाळेतून आल्यावर गृहपाठाचं टेन्शन असतं या सगळ्यामुळे शाळा साधारण सकाळी आठ पासूनच असाव्या असे मला वाटते. त्यातही खूप लहान मुलं म्हणजे १ ते ४ वर्गातील तर शाळा थोडी उशिराच हवी. कारण या मुलांची झोप नैसर्गिक जास्त असते, आणि ते वयही लहान असल्याने फार त्रासदायक होऊ शकते.

ट्रॅफिकच्या गर्तेत अडकून पडण्याची शक्यता

पुण्यातील शाळेतील मुलांची ने-आण करणारे स्वप्नील दगडे म्हणाले, यात आमचे मत फार महत्वाचे आहे असे मला वाटत नाही. पण पुण्यातल्या जवळपास ५० टक्के शाळा या सकाळच्या वेळेतच भरतात. पण जर याच शाळा थोड्या एक दोन तास पुढे गेल्या तर पुण्यातल्या ट्रॅफिकच्या गर्तेत अडकून पडण्याची शक्यता आहे.

विद्यापीठ चौकातच कितीतरी वेळ आम्ही रोज अडकून पडलेले असतो. त्याने होईल असे की ट्राफिक वाढल्याने मुलांना आणखी लवकर घरातून निघावे लागेल. तसेच लहान मुलांच्या शाळा नंतर भरवायचा म्हटलं तरी त्याचा खर्च वाढून बोजा पालकांवर पडेल.

school kid
Child Mental Health : सोशल मीडियावर तुमची मुलं किती वेळ घालवताय? 76% टक्के मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

झोप का पूर्ण होत नाही याचा विचार व्हावा..

महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे माजी अध्यक्ष आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे म्हणाले, प्रश्न मुलांनी लवकर उठावे की नाही हा नसून मुलांची झोप पूर्ण होत नाही असा आहे. मग ती झोप पूर्ण का होत नाही असा प्रश्न आपल्याला पडायला हवा.

फार पूर्वीपासून मुलांच्या शाळा या सकाळी भरत आहेत. ग्रामीण भागात तर सकाळी शाळा, दुपारी मोठी सुटी आणि दुपारनंतर पुन्हा शाळा हा खूप व्यवस्थित पद्धतीने राबविलेला प्रयोग होता.

एखादे उत्पादन बाजारात येण्याआधी जशी वातावरण निर्मिती केली जाते, तश्याच प्रकारचे रिसर्च समोर येतात, तज्ज्ञ देखील तेच बोलतात आणि त्यानंतर ते उत्पादन बाजारात येते. तसं काहीसा प्रकार इथे नाही ना? असा मला प्रश्न पडतो. मुळात यावर शास्त्रशुद्ध अभ्यास व्हायला हवा. मला वैयक्तिकरित्या झोप न होणे हा मुद्दा फारसा पटलेला नाही.

school kid
Children's Day 2023: जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?

या सगळ्या प्रातिनिधिक प्रतिक्रियांनंतर यात अनेक बाजू असल्याचे समोर येते आहे. सरकारला एखादी गोष्ट वाटते म्हणून किंवा सत्तेतील एखाद्या व्यक्तीचे म्हणणे आहे म्हणून एखादा निर्णय घेतला जाणे योग्य नाही.

विद्यार्थी हा प्रमुख घटक यात आहेच मात्र या सगळ्या प्रकारात अनेक उपघटक आहेत. प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे. ग्रामीण भागात आजही सकाळच्या शाळा भरविणे हे तितकेसे अवघड नाही कारण तिथला पालकवर्ग लवकर उठणारा आहे. पण शहरी भागात काही शाळा या एकाच इमारतीत सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात भरतात. इथे हा निर्णय कसा लागू करणार?

जर इथे लागू नाही झाला तर या विद्यार्थ्यांवर अन्याय नाही का होणार? आठ आणि नऊ नंतर शाळा भरवायचे झाल्यास पुण्यामुंबईसारख्या ठिकाणी वाहतुकीची परिस्थिती काय होईल? या सगळ्या बाबींचा सविस्तर विचार होणे आवश्यक आहे.

निर्णय घेण्यापेक्षा मार्गदर्शक सूचना, परिस्थितीनुसार लवचिक असणारे नियम तयार करणे या यातील मध्यम मार्ग असू शकतो. हा निर्णय होण्याआधी या विषयात विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा शास्त्रशुद्ध अभ्यास होणे जास्त गरजेचे आहे.

खरोखरच मुलांची झोप न होण्यामागे लवकर उठावे लागणे हे एकाच कारण आहे की यामागे रात्रीची जागरणे, टीव्ही पाहणे, मोबाईल पाहणे अशीही करणे आहेत याचा अभ्यास होणे आवश्यक आहे.

------

school kid
Children Mental Health : मुलांनाही असतो Stress अन् Tension;  असे बनवा त्यांना मानसिकदृष्ट्या Strong

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.