रश्मी विनोद सातव
काळ आणि फॅशन बदलली तरी भारतीय स्त्रीच्या आयुष्यातील साडीचं महत्त्व कधीच कमी होत नाही. स्त्रियांनी कल्पकतेनं नेसलेल्या निरनिराळ्या साड्या म्हणजे ‘समृद्ध परंपरा’ आणि एक ‘एलिगंट पेहराव’ यांची एक सुंदर गुंफण दिसून येते.
खरंतर साडी हे नुसतं एक वस्त्र नसून स्त्रीला आपल्या भावना व्यक्त करता येण्याचं ते एक प्रभावी माध्यम आहे! पिढ्यानपिढ्या संक्रमित होणारं, साडीचं हे नातं त्यातील सुंदर विणीतून पुढच्या-मागच्या पिढ्यांना एकत्र गुंफून ठेवतं. आई-आजीची मायेची साडी जतन करून ठेवणारी मुलगी असो, सासूबाईंच्या साडीतून वारसा जपणारी सून असो किंवा अगदी आजीच्या मऊसूत साड्यांची गोधडी पांघरणारा मुलगा असो... यातली साडी जरी जुनी झाली, तरी त्यातलं नातं मात्र अधिकच ‘गहिरं’ होत जातं!