पुरुष हॉकीव्यतिरिक्त, नेमबाजी, अॅथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, टेनिस हे भारताचे ऑलिंपिकपदक विजेते खेळ आहेत.
या खेळातील क्रीडापटूंनी पदक जिंकण्याची परंपरा राखली, तसेच इतरांनीही जोर लावल्यास पॅरिसमध्ये भारताची पाटी कोरी राहणार नाही हे निश्चित.
किशोर पेटकर
पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धांमुळे क्रीडा क्षेत्रात २०२४ वर्षाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
२६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत सुवर्ण, रौप्य, कांस्यपदकांसाठी जबरदस्त चुरस अनुभवायला मिळेल.
भारतातील काही क्रीडापटू ऑलिंपिकसाठी पात्र ठरले आहेत, काहींना पात्रतेची प्रतीक्षा आहे. आगामी महिन्यांत खेळाडूंच्या सहभागाबाबतचे एकंदरीत चित्र स्पष्ट होईल. फ्रान्सच्या राजधानीत होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेला ऐतिहासिक कोंदण लाभेल.
१८९६ साली ग्रीसमधील अथेन्स शहरात ऑलिंपिक चळवळीतील पहिली अधिकृत स्पर्धा रंगली. चार वर्षांनंतर ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद पॅरिसने भूषविले. पुन्हा १९२४ साली ऑलिंपिकचा थरार पुन्हा एकदा पॅरिस शहरात अनुभवायला मिळाला.
आता तब्बल शंभर वर्षांनी पुन्हा एकदा याच ठिकाणी ऑलिंपिक होत आहे. पॅरिससाठी यावेळचे ऑलिंपिक शतकमहोत्सवी आहे.
इंग्लंडमधील लंडननंतर (१९०८, १९४८, २०१२) तीन वेळा ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद भूषणविणारे पॅरिस अवघे दुसरेच शहर ठरेल.
दर चार वर्षांनी स्पर्धा होणे हा ऑलिंपिकमधील पूर्वापार चालत आलेला रिवाज, मात्र कोविड-१९ महासाथीने जगभर हाहाकार माजविल्यामुळे २०२० सालची ऑलिंपिक टोकियोत होऊ शकले नाही, परंतु क्रीडा महोत्सवाची ही चळवळ रोखली गेली नाही.
दृढनिश्चय आणि जिद्दीच्या बळावर २०२१मध्ये जपानच्या राजधानीतच स्पर्धा यशस्वी ठरली. आता तीन वर्षांनंतर पॅरिसमध्ये जगभरातील क्रीडापटूंचे कौशल्य, जोश, उत्साह ओसंडून वाहताना दिसेल.
या स्पर्धेपासून ऑलिंपिकची दर चार वर्षांची परंपरा पुन्हा पाळली जाईल. २०२८ साली अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे, तर २०३२ साली ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे ऑलिंपिक होईल. २०३६ सालची स्पर्धा घेण्यासाठी प्रयत्न भारत करत आहे.
गतवर्षी ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे (आयओसी) १४१वे सत्र मुंबईत झाले. त्यावेळी उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा ऑलिंपिक यजमानपदाचा प्रस्ताव उघड केला.
या भव्यदिव्य स्पर्धेची पूर्वतयारीच्या दृष्टीने २०२९ साली होणारी युवा ऑलिंपिक भारतात घेण्याचे प्रयत्न आहेत.
ऑलिंपिक चळवळीची पाळेमुळे विस्तारत आहेत, व्यापक होत आहे. या पार्श्वभूमीवर, पुन्हा एकदा शतकी प्रवासानंतर ऑलिंपिक चळवळ पॅरिसमध्ये येत आहे.
यावेळच्या स्पर्धा केवळ एका पॅरिस शहरातच होणार नसून फ्रान्समधील इतर सोळा शहरांतही काही खेळ होतील. शिवाय प्रशांत महासागरातील फ्रेंच पॉलिनेशिया द्वीपसमूहातील ताहिती येथे सर्फिंग स्पर्धा होणार आहे.
एकंदरीत यावेळच्या ऑलिंपिक स्पर्धेचे यजमान पॅरिस शहर असले, तरी स्पर्धा पूर्णतः फ्रेंच ठरेल असेच नियोजन आहे.
सप्टेंबर २०१७मध्ये पॅरिसच्या ऑलिंपिक यजमानपदावर शिक्कामोर्तब झाले. तेव्हापासून वाद-विवाद, टीका झेलत पॅरिस जगातील सर्वांत मोठी स्पर्धा यशस्वी ठरविण्यासाठी सज्ज होत आहे.
आतापर्यंत शंभरहून जास्त देशांतील क्रीडापटूंनी पात्रता मिळविली आहे. युक्रेनवरील आक्रमणामुळे रशिया, तसेच बेलारुसच्या सहभागाबाबत विरोध होत असताना या देशांतील क्रीडापटूंना स्वतंत्र खेळाडू या नात्याने ऑलिंपिकमध्ये भाग घेण्यास मंजुरी मिळाली आहे.
या दोन्ही देशांच्या क्रीडापटूंनी पॅरिस ऑलिंपिकमध्ये सोनेरी कामगिरी केल्यास त्या देशांचे राष्ट्रगीत वाजणार नाही, तसेच राष्ट्रध्वजही उंचावला जाणार नाही. फक्त क्रीडा गुणवत्ता प्रदर्शित होईल.
ऑलिंपिकमध्ये भारत कुठे?
सन १९८०मधील मॉस्को ऑलिंपिकमध्ये भारताने हॉकीतील अखेरचे सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर तपभराच्या कालावधीत एकही सुवर्णपदक आपल्या वाट्याला आले नाही.
मात्र आता परिस्थिती बदलली आहे. २००८ साली बीजिंग ऑलिंपिकमध्ये नेमबाज अभिनव बिंद्राने देशासाठी ऐतिहासिक वैयक्तिक पहिले सुवर्णपदक जिंकले.
२०२१ साली टोकियोत नीरज चोप्राने अॅथलेटिक्समध्ये पदकविजेती कामगिरी नोंदविताना भालाफेकीत अग्रक्रम प्राप्त केला.
पुरुष हॉकीतील सांघिक आठ सुवर्णपदके वगळता वैयक्तिक पातळीवर भारताची दोन सुवर्णपदके आहेत. १९०० साली पॅरिसमध्येच झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेच्या पदकतक्त्यात भारताच्या खाती दोन रौप्यपदके होती.
कोलकात्यात (तत्कालीन कलकत्ता) जन्मलेला ब्रिटिश-भारतीय अॅथलीट नॉर्मन प्रिचर्ड याच्यामुळे ही पदके भारताला मिळाली.
१९२८मधील अॅमस्टरडॅम ऑलिंपिकपासून भारतीय हॉकीचे ऑलिंपिकमधील सुवर्णयुग अवतरले. १९२८ ते १९५६ या कालावधीत भारतीय पुरुष हॉकी संघाने सलग सहा सुवर्णपदके जिंकण्याचा देदीप्यमान पराक्रम रचला.
कालांतराने हॉकीत आधुनिकता आली आणि परंपरागत भारतीय हॉकीचा करिष्मा अस्तंगत होत गेला.
आनंदाची बाब म्हणजे, मागील टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय पुरुष संघाने प्रदीर्घ कालावधीनंतर पदकप्राप्ती करताना कांस्य मिळविले. पैलवान खाशाबा जाधव हे वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकणारे पहिले भारतीय.
त्यांनी १९५२ साली हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. त्यानंतर वैयक्तिक क्रीडाप्रकारात जिगर दिसलीच नाही.
१९९६मध्ये लिअँडर पेसने अटलांटा ऑलिंपिकमध्ये टेनिसमधील पुरुष एकेरीत कांस्यपदक जिंकले आणि तेव्हापासून ऑलिंपिकमध्ये किमान एक पदक जिंकण्याची भारताची परंपरा कायम राहिली.
मल्ल सुशील कुमार (२००८ व २०१२) व महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू (२०१६ व २०२०) या भारतीय खेळाडूंनी लागोपाठ दोन स्पर्धांत पदके जिंकण्याचा पराक्रम साधला आहे. भारतीय क्रीडापटूंनी तीन वर्षांपूर्वी टोकियोत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
एक सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्यपदकांसह भारताला एकूण सात पदके मिळाली. यापूर्वी २०१२ साली लंडन ऑलिंपिकमध्ये भारताने दोन रौप्य व चार कांस्य अशी एकूण सहा पदकांची कमाई केली होती. थोडक्यात, ऑलिंपिक चळवळीत भारतीय क्रीडापटूंच्या कामगिरीचा आलेख उंचावत आहे.
शानदार कामगिरीची अपेक्षा
१९०० ते २०२० (२०२१) या ऑलिंपिक वाटचालीत भारताने दहा सुवर्ण, नऊ रौप्य व सोळा कांस्यपदके मिळून एकूण ३५ पदके जिंकलेली आहेत.
गतवर्षी चीनमधील हांग् चौऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पदकांचे शतक पार करताना २८ सुवर्ण, ३८ रौप्य व ४१ कांस्यपदकांसह एकूण १०७ पदके जिंकली.
या उत्साहवर्धक कामगिरीमुळे ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी क्रीडापटूंकडून अपेक्षा उंचावलेल्या आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा व ऑलिंपिक स्पर्धा यांच्यात फार मोठी दर्जात्मक तफावत आहे हे मान्य, तरीही भारतीय क्रीडापटू मोठी भरारी घेऊ शकतात हे हल्लीच्या काळात सिद्ध झालेले आहे.
गत ऑलिंपिक विजेता असल्याने, तसेच जागतिक पातळीवरील सातत्य यामुळे नीरज चोप्रा यावेळेसही सुवर्णपदकाचा प्रमुख स्पर्धक असेल. गेल्या २८ वर्षांच्या कालखंडात भारताला ऑलिंपिकमध्ये सलगपणे पदके मिळालेली आहेत.
दोन सुवर्णांसह १८ पदके मागील चार स्पर्धांतील आहेत. पुरुष हॉकीव्यतिरिक्त, नेमबाजी, अॅथलेटिक्स, कुस्ती, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, टेनिस हे भारताचे ऑलिंपिकपदक विजेते खेळ आहेत.
या खेळातील क्रीडापटूंनी पदक जिंकण्याची परंपरा राखली, तसेच इतरांनीही जोर लावल्यास पॅरिसमध्ये भारताची पाटी कोरी राहणार नाही हे निश्चित.
----------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.