Pune: राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षापासून राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता.२०) पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना सांगितले.
या बैठकीत पुणे जिल्ह्याच्या सन २०२३-२४ या वर्षामध्ये करण्यात आलेल्या वार्षिक विकास आराखड्यातील विकासकामांच्या १ हजार १९१ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली.
पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार मेधा कुलकर्णी, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ‘‘पुणे व पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत ४ लाख २९ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. ही योजना जुलै महिन्यापासून सुरु करण्यात आली असून यासाठी येत्या आॅगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांनासुद्धा जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी प्रत्येक महिन्याला साधारण ३ हजार ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत युवकांना प्रशिक्षणाची संधी मिळवून देण्यासाठी येत्या २७ जुलै रोजी पुण्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार असल्याने भविष्यातही चांगला रोजगार मिळण्यासाठी याचा उपयोग होऊ शकेल.’’
या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यांनी विद्यार्थिनींना शैक्षणिक शुल्क माफ करण्याबाबतच्या योजनेची माहिती दिली. यानुसार विविध शाखेच्या एकूण ६४२ अभ्यासक्रमासाठी ही योजना लागू करण्यात आली असून, यासाठी एकूण १ हजार ८०० कोटी रुपये खर्च होणार आहे. विद्यार्थिनींच्या शुल्काच्या प्रतिपूर्तीची रक्कम ही या योजनेसाठी महाविद्यालयांनी सुरु केलेल्या स्वतंत्र बँक खात्यात येत्या सप्टेंबर महिन्यात जमा करण्यात करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला आमदार दत्तात्रेय भरणे, दिलीप मोहिते पाटील, अशोक पवार, संग्राम थोपटे, सुनील शेळके, राहुल कुल, संजय जगताप, अतुल बेनके, सुनील टिंगरे, चेतन तुपे, सुनील कांबळे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, रवींद्र धंगेकर हे विधानसभेचे तर, उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, अश्विनी जगताप हे विधान परिषदेचे आमदार, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाचे आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुमारे दोन दशकांच्या खंडानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहिले. या बैठकीला शरद पवार हे पालकमंत्री अजित पवार यांच्या आगमनापूर्वीच सभागृहात आले होते. त्यामुळे या बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांचे आगम होताच, शरद पवार यांनीही प्रोटोकॉल पाळत उभे राहून पालकमंत्री अजित पवार यांचे स्वागत केले.
दरम्यान, या बैठकीत शरद पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या वाटपाची तालुकानिहाय माहिती देण्याची मागणी केली. त्यांच्या मागणीनंतर पालकमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत खासदार हे निमंत्रित सदस्य असतात. त्यामुळे ते फक्त सल्ला देऊ शकतात. प्रश्न विचारण्याचा अधिकार केवळ जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांना असल्याचे सांगत, पवार यांना बैठकीतील प्रश्न विचारण्याबाबतचा प्रोटोकॉल सांगितला आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणेही टाळले आणि निमंत्रित सदस्यांनी मागणी केल्यानुसार त्यांना निधी वाटपाची सविस्तर माहिती देण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.