- डॉ. माधव शिंदे
मुलांची झोप पूर्ण होत नसल्याने शाळेच्या वेळा पुढे ढकलण्याची सूचना राज्यपालांनी केली. हा बदल केल्यास होणाऱ्या अनिष्ट परिणामांकडे लक्ष वेधणारा लेख.
महाराष्ट्राच्या राज्यपालांनी शाळेच्या वेळेबाबत केलेल्या सूचनेवरून सध्या राज्यातील शैक्षणिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अलीकडच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे मुलांचे रात्रीचे जागरण वाढत असल्याने ते उशिरा झोपतात व सकाळी भरणाऱ्या शाळांमुळे त्यांना लवकर उठावे लागत असल्याने त्यांची पुरेशी झोप होत नाही.
त्याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता, शाळांची वेळ बदलून उशिरा ठेवावी, अशी सूचना राज्यपालांनी केली आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम रहावे, ही यामागची भावना असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, राज्यपाल महोदयांची सूचना अवास्तव, अव्यवहार्य आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
याचे कारण म्हणजे, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जोपासना करायची असेल तर त्यांनी रात्री लवकर झोपावे आणि सकाळी लवकर उठावे, असे भारतीय संस्कृती, आणि आयुर्वेद सांगते.
विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सकाळी लवकर उठून योग आणि अभ्यास करणे हितावह असल्याचे वेद आणि पुराणांमध्ये सांगितले आहे. आयुर्वेदानुसार सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठणे अत्यंत आरोग्यदायी असून सकाळी मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या प्राणवायूमुळे शरीर आणि मन ताजेतवाने राहते. तसेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढून ते निरोगी राहण्यास मदत होते. तसेच, सकाळी लवकर उठून केलेला योग दुर्धर व्याधींवर रामबाण उपाय मानला जातो.
विद्यार्थ्यांचे शारीरिक स्वास्थ्य लक्षात घेता, सकाळी लवकर उठणे आवश्यक असून किमान शाळेच्या वेळांमुळे तरी ते लवकर उठतात. सकाळच्या नैसर्गिक वातावरणाचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष लाभ त्यांना मिळतो. शाळेच्या वेळा उशिरा ठेवल्यास शाळकरी मुले अधिक आळशी बनून आरोग्यदृष्ट्या आणखी दुर्बल होतील, अशी शक्यता नाकारता येत नाही.
वाहतूक व्यवस्थेचे नियोजन
दुसरीकडे, शाळेच्या वेळा ह्या नियमित कार्यालयीन वेळेपेक्षा वेगळ्या ठेवण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, वाहतूकव्यवस्थेचे नियोजन हे होय. शाळेच्या वेळा आणि कार्यालयीन वेळा वेगवेगळ्या ठेवल्याने एकाच वेळी वाहतूकव्यवस्थेवर येणारा ताण कमी होण्यास मदत होते. याउलट शाळा आणि कार्यालयीन वेळा सारख्या केल्यास रस्त्यांवरील वाहतूक वाढून वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढण्याचा धोका अधिक आहे.
त्यामुळे शाळा आणि कार्यालयीन वेळा यांत अंतर असणे गरजेचे आहे. तसेच, शाळा आणि कार्यालयीन वेळा भिन्न ठेवण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे वीजवापराचे नियोजन हेही आहे. शाळा आणि कार्यालयीन वेळा सारख्या ठेवल्यास एकाच वेळी विजेचा मागणी वाढल्याने विजेची टंचाई वाढू शकते. त्यादृष्टीने वीजवापरात सुरळीतपणा आणण्यासाठी शाळा आणि कार्यालयीन वेळा यांत अंतर ठेवले जाते. याबाबींचा विचार करता, शाळेच्या वेळा ह्या कार्यालयीन वेळेपेक्षा भिन्न असणे गरजेचे आहे.
वास्तविकत: अलीकडील काळात लोकांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल होत आहेत. मोबाईल आणि इंटरनेटचा अतिवापर वाढल्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागरण वाढत आहे. इंटरनेट, मोबाईल आणि सामाजिक माध्यमांत पालकांनी स्वत:ला इतके गुंतवून घेतले आहे की, रात्रीचे बारा आणि एक कधी वाजतात हे पालकांच्याही लक्षात येत नाही. तर पालक उशिरापर्यंत जागे राहिल्याने मुलेही उशिरापर्यंत जागे राहतात, हे खरे.
सकाळी लवकर शाळा असल्याने मुलांना लवकर उठावे लागते. त्यामुळे त्यांची पुरेशी झोप होत नाही, हा राज्यपालांचा दावा खरा असला तरी, रात्री उशिरापर्यंत जागरण करणे हेच मुळात निसर्ग आणि आयुर्वेदाच्या विरुद्ध आहे. विशेष म्हणजे रात्री उशिरापर्यंत होणारे जागरण उत्पादक की अनुत्पादक याचा विचार करता, ते अनुत्पादक स्वरुपाचेच अधिक आहे, हे समोर येते. मग यात शाळेच्या वेळेचा काय दोष?
त्यामुळे रात्रीचे अनुत्पादक जागरण, मुलांची न होणारी झोप आणि त्याचे आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेता, पालकांनी स्वत:ला शिस्त लावून रात्रीच्या जागरणावर मर्यादा आणणे अधिक आवश्यक आहे. त्यादृष्टीने रात्रीच्या टीव्ही, मोबाईल, इंटरनेट वापरावर काही मर्यादा आणता येतील का, याचा खऱ्या अर्थाने विचार होणे अधिक योग्य राहील. शाळेच्या वेळा बदलण्यामुळे विद्यार्थी अधिक आळशी होऊन शैक्षणिक कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. याचा गांभीर्याने विचार व्यायला हवा.
(लेखक अहमदनगर महाविद्यालयात अर्थशास्त्राचे अध्यापन करतात.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.