निवडणुकीचे निकाल हरियानात लागले. त्याचे राजकीय पडसाद उमटताहेत ते महाराष्ट्रात.
हरियानातील विधानसभा निवडणुकीच्या अनपेक्षित अशा निकालांचे पडसाद महाराष्ट्रात लगेचच उमटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीतील ऐक्याचा ‘निक्काल’ लागतो का काय, याकडे महायुतीचे डोळे लागले असतील तर नवल नाही. हरियानातील निकालांचा परिणाम म्हणून महायुतीतही जागावाटपात भाजपच्या शब्दाचे वजन वाढणार, असे चित्र निर्माण झाल्याने तिथेही अप्रत्यक्ष तणाव आहेच.
पण निदान त्यांच्यात जाहीर कलगीतुरा तरी झालेला नाही. महाविकास आघाडीत मात्र तेही पथ्य पाळले गेलेले नाही. राहुल गांधी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यानंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकांत कॉँग्रेसला आपण हरियाना जिंकू, असे वाटत होते.
पण अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही, हे बघताच महाविकास आघाडीतील मराठी बाण्याचा पक्ष स्वधर्मानुसार जागा झाला अन् फाजील आत्मविश्वासामुळे कॉंग्रेसच्या हातून हरियाना गेल्याचे कटू सत्य त्यांनी लगेचच सांगायला सुरुवात केली. ते मांडताना ‘आघाडीधर्मा’चा वगैरे त्यांना विसर पडलेला दिसतो. आपला सामना हा महाविकास आघाडीतल्या स्वजनांशी नसून तो भाजपप्रणित सत्ताधारी महायुतीशी असल्याचे वास्तव दुर्लक्षिले गेले.
‘कॉंग्रेसला स्वबळावर लढायचे असेल तर तसे सांगून टाका’, इतके बोलण्यापर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मजल गेली. मग कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही मैदानात उतरले. त्यांनी हरियाना व महाराष्ट्र येथील परिस्थिती पूर्णतः भिन्न आहे.
हरियानात पराभव झाला असला तरी महाराष्ट्र जिंकणार आहोत, हे त्यांनी ठणकावले. सहकारी पक्षावर जाहीर टीका केल्याचा जाब जागावाटपाच्या बैठकीत विचारला जाईल,असेही त्यांनी घोषित केल्याने त्यांच्यातील विसंवाद चव्हाट्यावर आला.
‘इंडिया’ या महाआघाडीचा भाग असलेले दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कालच कॉंग्रेसला सुनावले होते. केजरीवाल जिथे कचरले नाहीत, तिथे ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा’चे प्रवक्ते गप्प राहतील, हे शक्य नव्हतेच. ‘इंडिया’मध्ये अन्य पक्षांना महत्त्व दिले गेले तर काँग्रेसला यश मिळते; अन्यथा नाही, हे त्या पक्षाने स्पष्टच बोलून टाकले.
उद्धव ठाकरे यांनी हरियानाचा निकाल लागताच आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा पुढे करावा, या मागणीचा पुनरुच्चार केला. सहकारी पक्षासमवेत निवडणुका एकत्र लढण्यानंतर जिंकलेल्या जागांमध्ये दुपटीचा फरक असला तरी मुख्यमंत्रीपद मागायला सरसावलेले उद्धव ठाकरे यावेळीही मुख्यमंत्रीपद हवे आहे, असे आडून सुचवत आहेत.
पाच वर्षांपूर्वीही त्यांनी जागा कितीही जिंकल्या तरी अर्धी-अर्धी सत्ता याचा अर्थ म्हणजे अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद असा घेतला होता. आता हाच खेळ नव्याने सुरू झाला आहे काय, असा प्रश्न तमाम मराठी माणसांना पडला नसेल तर नवल ते काय? काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे अप्रत्यक्षपणे नेपथ्य रचत ‘चेहरा द्या आणि निवडणुका लढा’ असे सुचवले होते. त्यावेळी काँग्रेस भलतीच जोशात होती.
त्यामुळे ही मागणी धुडकावली गेली. आता हरियानात पदरी अपयश पडल्यानंतर काँग्रेसचे तथाकथित मित्र पुन्हा एकदा बोलू लागले आहेत. खरे तर ‘इंडिया’ आघाडीचे सदस्य असलेल्या अनेक पक्षांमध्ये कोणतीही वैचारिक समानता नाही. सगळे सत्तार्थी असल्याने परस्परांच्या जवळ आले आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला विरोध हाच त्यांना जोडणारा एकमेव मुद्दा आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात निदान धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा हे समान सूत्र आहे. उद्धव ठाकरे मात्र या दोघांबरोबर सामील झाले, ते मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भाजपने पूर्ण न केल्याने. त्यातून हा कलगीतुरा तीव्र स्वरूपात पुढे येत आहे. हरियानातील निकाल लागताच कॉँग्रेसवर थेट टीका करणे याचा संबंध जागावाटपाशी आहे.
काँग्रेस महाराष्ट्रात जास्त जागा लढवेल, असे वाटत होते. लोकसभेतले त्यांचे यशही ही मागणी ग्राह्य ठरवत होते. काँग्रेसमुळेच अल्पसंख्यांकांची मते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळाली होती हे उघड आहे. मात्र आता संधी मिळताच त्यांनी काँग्रेसला इशारा देणे सुरू केले आहे. हे इशारे अर्थातच आपल्या पक्षाला जागा जास्त मिळाव्यात यासाठी आहेत.
हरियानातील निकालांचा धडा कॉँग्रेस पक्ष घेणार की नाही, हाही प्रश्न आहेच. ते गाफील राहिले तर ते भाजपच्या पथ्यावर पडेल. आपल्या पक्षातील एकजूट आणि आघाडीतील एकसंधता या दुहेरी आव्हानाला त्यांना सामोरे जायचे आहे, हे मात्र या घडामोडींमुळे स्पष्ट झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.