bilquis mir
bilquis mirsakal

यश गाठणारी ‘नौका’

खेळाचा महाकुंभ असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेची फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये नुकतीच सुरुवात झाली.
Published on

खेळाचा महाकुंभ असलेल्या ऑलिंपिक स्पर्धेची फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये नुकतीच सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे एखाद्या स्टेडियममध्ये न होता ऐतिहासिक सीन नदीच्या तीरावर पारंपरिक पद्धतीने उद्घाटन सोहळा पार पडला. या वेळी स्पर्धेत सहभागी देशांच्या पथकांची एक-एक बोट सीन नदीतून मार्गक्रमण करत जात होती.

या सोहळ्यात भारतीय पथकाचे नेतृत्व केले ते बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने. बोटीतून तिरंगा उंचावताना तिच्यासह भारतीय खेळाडूंचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सीन नदीच्या तीरावरील या ऑलिंपिकची सर्वत्र चर्चा असताना, नौकानयन क्षेत्रातील एका भारतीय महिलेने मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

बिल्किस मीर असे या महिलेचे नाव आहे. त्यांची ऑलिंपिकमध्ये ज्युरी म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे ऑलिंपिकमध्ये ज्युरी म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

मूळच्या जम्मू-काश्मीरच्या असलेल्या बिल्किस यांचा नौकानयनपटू (कॅनॉइस्ट) म्हणून सुरू झालेला प्रवास आज याच खेळातील ऑलिंपिकमध्ये ज्युरीपर्यंत पोहोचला आहे. हा प्रवास पाहिल्यास तो अगदी थक्क करणारा आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्या नौकानयनाकडे वळल्या. सुरुवातीच्या काळात या खेळासाठी लागणाऱ्या प्राथमिक सुविधाही त्यांच्याकडे उपलब्ध नव्हत्या.

त्यांनी श्रीनगरच्या प्रसिद्ध दल सरोवरात कॅनॉईंगचा सराव सुरू केला. खेळाप्रति असलेला दृढसंकल्प आणि चिकाटीमुळे त्यांनी परिस्थितीवर मात करत विविध स्पर्धांमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये त्यांनी प्रेरणादायी कामगिरी बजावली. एवढेच नव्हे, तर विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधीही त्यांना मिळाली होती.

कॅनॉइस्ट म्हणून बिल्किस यांची या खेळातील प्रतिभा लक्षात घेता मागील वर्षी चीनच्या होंग्झू येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतही त्यांना ज्युरी म्हणून संधी मिळाली होती. कॅनॉईंगमध्ये प्रामुख्याने युरोपीय देशांचा दबदबा आहे. यंदाच्या ऑलिंपिकमध्ये दोन आशियाई देश कॅनॉईंगमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत.

एक जपान आणि दुसरा म्हणजे बिल्किस मीर यांच्या रूपात भारत. त्यामुळे भारतासाठी ही मोठी गौरवास्पद बाब आहे. याशिवाय बिल्किस भारतीय महिला कॅनॉईंग टीमच्या प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात महिला ब्रिगेड विविध स्पर्धांसाठी तयारी करत आहेत.

बिल्किस यांची ऑलिंपिकमध्ये ज्युरी म्हणून निवड झाल्याबद्दल त्या म्हणतात, ‘माझा जन्म जम्मू-काश्मीरमधला. वयाच्या सहाव्या वर्षापासून मी नौकानयन (कॅनॉईंग व कयाकिंग) या खेळाशी माझे बंध जुळले. दल सरोवरात मी अनेकदा सराव केलाय; पण सुरुवातीच्या काळात, तर या खेळासाठी आवश्यक असलेल्या सेवा-सुविधाही उपलब्ध नव्हत्या, परंतु माझे कुटुंबीय माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.

आईने तर तिचे दागिने विकून मला प्रोत्साहन दिले. त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर मी आज इथवर पोहोचले आहे. मागील ३२ वर्षांपासून मी या खेळाशी संबंधित आहे. या खेळावर मनापासून प्रचंड प्रेम केले. अगदी विश्‍वचषकातही मी भारताचे प्रतिनिधित्व केले. जम्मू-काश्मीरपासून सुरू झालेला माझा प्रवास आता थेट ऑलिंपिकमध्ये ज्युरीपर्यंत येऊन पोहोचलाय.

ही संधी मिळणे माझ्यासाठी स्वप्नपूर्तीचा क्षण आहे. माझी कारकीर्द पाहून देशातील युवकांची पावले या खेळाकडे वळायला हवीत. केवळ जम्मू-काश्मीरच नव्हे, तर देशातील इतर राज्यातही नौकानयन हा खेळ पुढे यायला हवा,’ अशी प्रांजळ इच्छा बिल्किस यांनी बोलून दाखविली.

बिल्किस मीर यांची ऑलिंपिक स्पर्धेत ज्युरी म्हणून झालेली निवड ही जम्मू-काश्मीर आणि भारतासाठी अभिमानास्पद तर आहेच, शिवाय देशातील महिला खेळाडूंसाठी मोठा सन्मान आहे. त्यांचा नौकानयनपटू म्हणून आजवरचा प्रवास हा कोणत्याही खेळाडूसाठी दीपस्तंभासारखा आहे.

त्याचा प्रकाश युवा खेळाडूंना विशेषतः मुलींना विविध आव्हाने, परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रोत्साहित करणारा आहे. त्यांचा आदर्श घेत, प्रेरणा घेत भविष्यात नौकानयनात अनेक खेळाडू भारताचा नावलौकिक वाढवतील, हे मात्र खरे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.