चांगली झोप का आवश्यक?

आपण का झोपतो, याचं रहस्य अजूनही कायम आहे. आपल्या आयुष्यातील एक तृतीयांश काळ आपण झोपेतच घालवतो.
Sleep
Sleepsakal
Updated on

- डॉ. अनिल राजवंशी, anilrajvanshi@gmail.com

आपण का झोपतो, याचं रहस्य अजूनही कायम आहे. आपल्या आयुष्यातील एक तृतीयांश काळ आपण झोपेतच घालवतो. निसर्ग आपल्याला एवढा वेळ झोपायला लावतो, यामागं काही तरी चांगलं कारण असणार. शास्त्रीय संशोधनातून झोपेचं हे कोडं आता हळू हळू, पण निश्चितपणे उकलण्याचं प्रयत्न होत आहेत.

झोपेबद्दल विविध सिद्धान्त आजवर मांडले गेले. बहुसंख्यांना मान्य असलेला त्यातला एक असं सांगतो की, झोपेमुळं आठवणी दृढ करण्यास आणि त्यातील काही विसरण्यासही मदत होते. जाणिवा-संवेदनांच्या माध्यमातून दिवसभर आपण जगात वावरत असतो. पाहत आणि ऐकत असतो. त्यातून तात्पुरत्या आणि दीर्घकालीन टिकणाऱ्या, अशा दोन्ही आठवणींची भर पडते. त्यातल्या काही आठवणी एकत्रित करण्यास आणि काही काढून टाकण्यास झोपेची मदत होते. त्यामुळे मेंदूत झालेला आठवणींचा पसारा व्यवस्थित आवरून ठेवला जातो.

झोपेचा अलीकडील एक सिद्धान्त मोठा मजेचा आणि सप्रयोग सिद्ध झालेला आहे. त्यानुसार झोपेमुळे मेंदूतील कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. त्यातील विषारी प्रथिनांचा कचरा आणि जैविक राडारोडा झोप घेतल्यामुळे बाहेर फेकला जातो. आपण झोपेतून जागे होतो, त्या वेळेस मेंदू नेहमीप्रमाणे कार्यरत होत असताना ही प्रक्रिया घडते.

झोपेत असताना मेंदूला विश्रांती मिळते. त्यामुळे हा कचरा, राडारोडा वाहून नेणाऱ्या वाहिन्या उघडल्या जातात. तेथून तो सारा रक्तप्रवाहात जातो आणि त्यातून तो काढून टाकला जातो. चांगल्या झोपेमुळे काय लाभ होतो, हे जगभरात मोठ्या प्रमाणावर केलेल्या अभ्यासातून दिसून आलं आहे. पुरेशी झोप न झाल्यास काय होतं?

निर्णयक्षमतेवर परिणाम, नैराश्यासारखे मानसिक आजार, हृदयासंबंधीचा त्रास, लठ्ठपणा आणि सर्वसाधारण तंदुरुस्ती लक्षणीयरीत्या कमी होते. एखादं उदाहरण असंही दिसतं की, दीर्घ काळ चांगली झोप न लागल्याचा परिणाम मृत्यूने गाठण्यातही होतो. ‘हृदयानं काम करणं थांबवलं’, असं मृत्यूचं कारण असलं, तरी तो अपुऱ्या झोपेचाच परिणाम असतो. किंबहुना असं म्हणता येईल की, व्यवस्थित झोप न लागणं हेच आजारपणाचं पहिलं लक्षण होय.

मेंदूच्या नसांची कार्यक्षमता टप्प्याटप्प्यानं कमी करणाऱ्या स्मृतिभ्रंश, विसरभोळेपणा यांसारख्या विकारांना कारणीभूत ठरणारं किटण (प्लेक - बीटा ॲमलॉईड) झोपेच्या वेळी बाहेर फेकलं जातं, असं शास्त्रीय अभ्यासातून दिसलं आहे. त्यामुळेच निरोगी मेंदू आणि उत्तम शारीरिक आरोग्यासाठी चांगली झोप गरजेची आहेच आहे!

झोप अपुरी झाल्यामुळे मेंदूमध्ये तयार होणाऱ्या विषद्रव्यांचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. हे कसं घडतं, याविषयी अजून फारसं काही उमगलेलं नाही. अशी एक शक्यता वर्तविली जाते की, प्राणेशा तंत्रिकेच्या (वेगस नर्व्ह - हा दहावा मज्जातंतू सर्वात लांब आणि सर्वात जटिल आहे.) माध्यमातून ती शरीरात सर्वत्र पोहोचतात. तयार झालेल्या कचऱ्यामुळे मेंदूवर परिणाम होत असल्याचं जाणवू लागतं, तसतसं प्राणेशा तंत्रिका सर्व अवयशवांना संदेश पाठविते. त्यातून त्यांची कामाची गती मंदावण्याची शक्यता असते. त्यातूनच हे सगळे अवयव सुस्तावतात.

आठवणी निकाली निघतात, स्मृती विसर्जित होतात त्या गाढ झोप आणि ध्यानधारणा यांच्यामुळे. त्यामुळे या दोन्हींची काही समान वैशिष्ट्ये असतील. ध्यानधारणा करीत असताना मेंदूतील विषारी द्रव्ये बाहेर फेकली जाणेही शक्य आहे. ध्यानधारणा केल्यामुळे मेंदूला विश्रांती मिळते आणि त्यामुळे रासायनिक कचरा नेणाऱ्या वाहिन्या उघडण्यास मदत होते, अशी ही यंत्रणा असण्याची शक्यता दिसते.

स्मृती कशी तयार होते? नवीन तंत्रिका मार्ग (चेतामार्ग) तयार करून आणि मेंदूतील विशिष्ट रासायनिक बदल; या दोन्ही मार्गांनी. त्यामुळे या दोन्ही यंत्रणांमधील घडणारे बदल स्मृती हटविण्याबाबत स्वाभाविकपणे परिणाम करणारे असतात.

दीर्घ काळ एकाच विचारावर लक्ष केंद्रित करून केलेल्या ध्यानामध्ये नवीन चेतामार्ग तयार होतात आणि जुने विलयास जातात. (या दीर्घ ध्यानपद्धतीला पतंजली ऋषींनी ‘संयम’ असं संबोधलं आहे.) या विघटनात विषद्रव्याचा कचरा तयार करणारी रासायनिक चिन्हे असू शकतात. ती बाहेर फेकली जाणे आवश्यक असते.

चांगली झोप लागावी म्हणून आपल्याला काय करता येईल? सर्वसाधारणपणे चांगलं आरोग्य असणाऱ्या आणि नित्यनियमानं व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला चांगली झोप येते. गाढ झोप येण्यासाठी ध्यानधारणेचीही मोलाची मदत होते. दीर्घ काळ नियमित ध्यानधारणा केल्यामुळे मन आणि शरीर बळकट होतं, असं जगभर झालेल्या अभ्यासातून सिद्ध झालं आहे.

अंथरुणावर पडल्या पडल्या झोप लागावी म्हणून ध्यान करावं. त्यात डोळे बंद करून कपाळाच्या मध्यभागी लक्ष केंद्रित करावं. या पद्धतीचं ध्यान झोपण्यापूर्वी करता येतं. झोपेत असताना रात्री अचानक जाग येते आणि नंतर पुन्हा झोप लागत नाही, असा त्रास असणाऱ्या व्यक्तीलाही अशा पद्धतीची ध्यानधारणा करणं फायद्याचं ठरतं. त्याचप्रमाणे ध्यानधारणेच्या अन्य काही युक्त्या आणि तंत्रंही असतील की, त्यामुळे पडल्या क्षणी गाढ झोप लागेल.

(अनुवाद - सतीश स. कुलकर्णी)

shabdkul@outlook.com

(लेखक हे फलटण येथील ‘निंबकर ॲग्रिकल्चरल रिसर्च इनस्टिट्यूट’ चे संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.