महाराष्ट्रात देवीची अनेक मंदिरे आहेत. त्या मंदिरांमध्ये देवीचे अनेक भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. नवरात्रौत्सवात तर देवीच्या मंदिरांमध्ये गर्दीचा महापूर उसळतो. एखादं मंदिर डोळ्यासमोर आलं की, तिथे असलेली गजबज, विक्रेते, भाविक लक्षात येतात. पण, महाराष्ट्रात देवीचे असे एक मंदिर आहे जे स्मशानात आहे.
पुण्यातील शिरूरमधील कान्हूर या गावी मेसाई देवीचे मंदिर आहे. कान्हूर गावात एका बालिकेच्या रूपात मेसाई देवीने जन्म घेतला. तसेच, गावात नाही तर गावाबाहेर असलेल्या स्मशानभुमित या देवीचा ठिकाणा आहे. म्हणजे गावाबाहेर असलेल्या स्मशानात मेसाई देवीचे मंदिर आहे. त्यामुळे या देवीला स्मशाननिवासिनी म्हटलं जातं. (Navratri 2024)
मेसाई देवी ही माता कालीचा अवतार आहे. ज्यावेळी आई अंबाबाई, माहूरगडची रेणूका अशा सर्व देवता एकत्र होत्या. तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या गड अन् शहरांची निवड केली. तेव्हा कालीचा अवतार असलेल्या मेसाई देवीने सर्व भगिनिंना विचारलं की, देवातांनो,मी कुठे जाऊ.. त्यावर गमतीने सर्व देव्यांनी ‘तू जा मसनात’ (स्मशानात)असं सांगितलं. तेव्हा देवीने सर्व देवतांचा आदर ठेऊन स्मशानात जाणे पसंत केलं.
नाशिकवरून देवी वाटचाल करत येत होती. तेव्हा लमाणी समाजाच्या तांड्याने तिला पुण्यापर्यत आणलं. त्यानंतर एका माळ्याला देवीने सांगितले की मला कान्हूर गावी सोड. देवी कान्हूर गावी आली आणि गावाबाहेर असलेल्या स्मशानात राहू लागली. तेव्हा तिचे छोटे मंदिर उभारण्यात आले. त्याकाळातील भक्तांना देवीच्या भक्तीची प्रचिती आली. लोकांनीही देवीची नित्यनियमांनी पूजा अर्चा केली.
भगवान परशुरामांनी पिता जमदग्नी ऋषींच्या आदेशानुसार माता रेणुकेचे शीर धडावेगळे केले. त्यानंतर, जमदग्नीऋषींनी परशुरामाला वर मागण्यास सांगितले. तेव्हा मातृभक्त परशुरामांनी पित्याकडे माता रेणुकेला जिवंत करावे अशी मागणी केली. तेव्हा रेणुका मातेचे शीर सापडले नाही. त्यामुळे, तिथे असलेल्या एका मातंगी समाजातील महिलेचे शीर देवीला बसवण्यात आले अन् रेणुका माता जिवंत झाली.
त्यामुळेच, देवीच्या गाण्यांमध्ये ‘शीर मातंगी धड रेणूका, झाली जिवंत रेणूका’ असे म्हणतात. स्वत:चे शीर देवीला दिल्याने मातंगी देवी अजरामर झाली. त्यानंतर परशुराम भगवानांनी मातंगीला वरदान दिले की, रेणूका देवीच्या आधी तुझी पूजा केली जाईल.मातंगी देवीची अनेक रूपे आहेत, देवीला काही ठिकाणी मायाराणी, मैस्साई नावांनी ओळखली जाते. मेसाई म्हणजे साक्षात आदिमाया,आदिशक्तीचेच रूप.
स्मशानात आहे म्हणजे देवीचे मंदिर छोटेखानी असेल असे नाही. मेसाई देवीचे मंदिर भव्य-दिव्य आहे. मंदिराची स्वागत कमान नक्षीदार आहे. तर, भलामोठा सभामंडप देवीच्या गाभाऱ्यासमोर आहे. मंदिरात सिंहाची प्रतिकृती आहे.
मंदिरात पूजा करण्याचा मान फक्त विधवा स्त्रियांना आहे. इतर भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही. तसेच, दरवर्षी चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.