कोकण-रत्नागिरी येथे अथांग पसरलेला समुद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सागरीमार्गाने परदेशी हल्ले होण्याचा धोका होता. त्यामुळे, समुद्रावर नजर ठेवता यावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात अन् बाजूच्या डोंगरांवर किल्ले बांधले आहेत. त्यापैकी एक किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात असून त्याला रत्नदुर्ग अथवा भगवती किल्ला असेही म्हटले जाते.
या किल्ल्यावर भगवती देवीची मंदिर आहे. त्यामुळेच या किल्ल्यालाही तिच्या नावाने ओळखले जाते. भगवती माता हे आदिमाया आदिशक्तीचेच रूप आहे. तिच्या जन्माबाबत कथा सांगितली जाते. आज नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला आपण त्याबद्दलच जाणून घेऊयात. (Ratnadurga Fort)
रत्नागिरी शहरापासून अवघ्या २-३ कि.मी. वर असणारा रत्नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे तो त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिरामुळे, येथून दि्सणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणाऱ्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे.
किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच सुबक बांधणीचे श्री भगवतीचे शिवकालीन मंदिर आहे. भगवती देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर एका ठिकाणी चारही बाजूंनी भिंतींनी संरक्षित केलेली एक जागा आपल्याला दिसते. हाच तो तीन तोंडाचा भुयारी मार्ग.
तीन तोंडाच्या भुयारी मार्गापासून थोडे पुढे चालत गेले असता समुद्राचे मनोरम दर्शन घडवणारा एक बुरूज लागतो. या बुरुजाचे नाव रेडे बुरूज असून यावर एक स्तंभही उभारला आहे.
किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह असून या दीपगृहावरून संपूर्ण रत्नागिरी शहराचे तसेच समुद्राचे अत्यंत सुंदर दृश्य दिसते. किल्ल्यात एक लहान तळे व एक खोल विहीर आहे.
फार पूर्वी कोल्हासूर आणि रत्नासूर, असे दोन दैत्य भाऊ कोल्हापूरक्षेत्री रहात होते त्यांचा वध करण्यासाठी देवतांनी अवतार घेतले. प्रारंभी कोल्हापूरक्षेत्री श्री अंबाबाईने कोल्हासूर राक्षसाचा वध केला, कोल्हासूर राक्षसाच्या नावावरून कोल्हापूर हे नाव सार्थ झाले.
कोल्हासूराचा मुलगा करवीर याचा श्री अंबाबाईने वध केला. पुढे महाबलाढ्य कोल्हासूराटा भाऊ रत्नासूर हा कोल्हापूरक्षेत्री पुष्कळ त्रास देऊ लागला. 'त्याचे परिपत्य कसे करायचे ?' अशी चिंता श्री अंबाबाईला लागली. या राक्षसाचा दरारा कोल्हापूरपासून ज्योतिबाच्या वाडीपर्यंत होता. (Bhagvati devi )
रत्नासूराचा नायनाट करण्यासाठी श्री अंबाबाईने कोल्हापूरच्या डोंगरावर तपश्चर्या करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे तपश्चर्येला प्रारंभ केला; कारण या राक्षसाचा वध श्री अंबाबाईच्या हातून होण्यासारखा नव्हता.
श्री अंबाबाईने तीन वर्षे तपसाधना केल्यावर शंकर प्रसन्न झाले आणि देवीला आशीर्वाद देऊन म्हणाले, 'देवी तुझी तपसाधना पूर्ण झाली. हवा तो वर माग.' त्या वेळी देवीने वर मागितला, 'रत्नासूराचा वध माझ्या हातून होऊ दे.
त्यावेळी भगवान शंकर म्हणाले, 'देवी ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी तुला ज्योतिबा, भैरव आणि रवळनाथ यांचे साहाय्य घ्यावे लागेल, तसेच रत्नासूर राक्षसाला मारण्यासाठी तुला दोन बहिणी निर्माण कराव्या लागतील. त्यासाठी आणखी दोन वर्षे तपश्चर्या करावी लागेल.' त्याप्रमाणे श्री अंबाबाईने एका पर्वतावर जाऊन २ वर्षे तपश्चर्या केली.
तपश्चर्येने भगवान शंकर प्रसन झाले अन् देवीला आशिर्वाद दिला. देवीने डोळे उघडून पाहिले, तर तिच्यासमोर दोन बहिणी उभ्या होत्या. एक श्री भगवती आणि दुसरी श्री टेंबलाई, भगवान शंकरांनी या दोन देर्वीना तिच्यासमोर उत्पन्न करून दिले.
'देवी श्री महालक्ष्मी, तुझी तपश्वर्या पूर्ण झाली. या दोन बहिणी तुझ्या साहाय्याला घे', असे सांगून भगवान शंकर अंतर्धान पावले. श्री अंबाबाई नंतर श्री टेंबलाई आणि श्री भगवती या दोघींना समवेत घेऊन ज्योतिबाच्या वाडीला आली, ज्योतिबाच्या वाडीत आल्यावर रत्नासूर राक्षसाला देवतांनी कोंडीत पकडले. त्यावेळी श्री भगवती देवीने उग्र रुप धारण केले आणि शंखनाद करून सर्वांना साहाय्याला बोलावले.
त्यावेळी श्री ज्योतिबा, श्री रवळनाथ, श्री भैरव, श्री टेंबलाई या सर्व देवतांनी श्री भगवती देवीला साहाय्य केले. आठ दिवस ज्योतिबाच्या वाडीला रत्नासूर राक्षसासह युष्द चालू होते. नवव्या दिवशी श्री भगवतीदेवीने रत्नासुरावर सुदर्शन चक्र सोडले, त्याच्यावर तलवार उगारुन शीर धडावेगळे केले.
तो राक्षस रक्ताने मांखला आणि धरणीवर कोसळला शेवटी श्री अंबाबाई आणि इतर देवतांनी फुले उधळून श्री भगवती देवीचा जयजयकार केला. अशातन्हेने रत्नासूर राक्षसाचा वध केला म्हणून त्याच्या नावावरून 'श्री रत्नेश्वरी भगवती' हे नाव श्री अंबाबाईने भगवती देवीला दिले.
श्री अंबाबाईने श्री भगवती देवीला सांगितले, 'तुझे काम पूर्ण झाले. तू या राक्षसाच्या तावडीतून जनतेची सुटका केलीस, तुझे काम संपले तू आता कोकणात जाऊन रत्नागिरीत वास्तव्य कर आणि संकटाच्या वेळी भक्तांना साहाय्य कर. भक्तांच्या हाकेला धावून दे.'
पुढे देवी चालत मार्गक्रमण करत विशाळगडावर आली. त्यानंतर हातखंबा गावी कदम यांच्या घरी उतरली, तिथे तिचे स्वागत करण्यात आले. कदम यांच्या घरी राहून रत्नागिरी येथे आली तेथे आल्यावर देवी खेर, गुजर आणि सावंत यांच्या घरी उतरती. नंतर भगवती देवी रत्नागिरी गडावर (रत्नदुर्ग किल्ला) स्वयंभू रुपात राहिली.
(संबंधित माहिती श्री देवी भगवती ट्रस्ट किल्ला, रत्नागिरी, यांच्याकडून घेण्यात आली आहे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.