म्हसदी : येथील आदिमाया, कुलस्वामिनी धनदाईदेवी मंदिराजवळ नवरात्रोत्सवात दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होतील. नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आदिमाया धनदाईदेवीचे मंदिर २४ तास खुले असणार आहे. मंदिर परिसराची साफसफाई केली जात असून, विद्युत रोषणाई केली जात आहे. यापूर्वीच मंदिरावर रंगरंगोटी करण्यात आली आहे. (Dhanadai Devi temple in Mhasadi open for 24 hours)
आदिमाया धनदाईदेवीजवळ राज्यभरातील ७७ पेक्षा अधिक कुळांचे भाविक दर्शन, नवसपूर्तीसाठी हजेरी लावतात. दहा दिवसीय नवरात्रोत्सवात देवीजवळ भाविक विविध धार्मिक कार्यक्रम करतील. भाविकांना श्री.धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळातर्फे विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मंदिराजवळ भाविकांची दहा दिवस मांदियाळी असणार आहे. नवरात्रोत्सवात लाखो भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होतात. डोंगराच्या कुशीत धनदाईदेवीचे पुरातन मंदिर आहे.
चक्रपूजा व घटस्थापना
भाविक धनदाईदेवीजवळ घटस्थापना, चक्रपूजेला प्राधान्य देतात. पहिल्या माळेस धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळातर्फे घटस्थापना केली जाते. मंदिराच्या सभागृहात भाविकांना घट बसविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. कुलदैवत मानणारे भाविक देवीजवळ घटस्थापना करत दहा दिवस मुक्कामी असतात.
भाविकांसाठी मोफत निवासाची सोय आहे. शिवाय मंदिरावर मानाचा ध्वज चढवला जातो. पंचमी, सप्तमी, अष्टमी व नवमीला भाविक चक्रपूजा व आरतीला विशेष प्राधान्य देतात. मंदिराच्या पायथ्याशी स्थानिक कायमस्वरूपी व्यावसायिकांची पुजेच्या साहित्याची दुकाने असून, इतरत्र बाहेरगावचे व्यावसायिक दुकाने थाटतात.
पहाटेच्या काकड आरतीने चैतन्य
नवरात्रोत्सवात पहाटे साडेपाच वाजल्यापासून भाविकांची पाऊले मंदिराकडे वळतात. मंदिराजवळ गेल्या अनेक वर्षांपासून पाच वाजून ४५ मिनिटांनी सामूहिक काकड आरती केली जाते. आरतीसाठी स्थानिकांसह परिसरातील भाविकांची उपस्थिती असते.
भाविकांना दर्शन सुलभ, जलदगतीने व्हावे, मंदिर व परिसरात गर्दी थोपवून राहू नये म्हणून धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाने नियोजन केले आहे. शिवाय साक्री पोलिसांचा बंदोबस्त असेल. वीज उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य असते. आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालय, स्थानिक शाळांचे विद्यार्थी, युवक स्वयंसेवक म्हणून दहा दिवस सहकार्य करतात. (latest marathi news)
आदिमायेस रोज नवरंगाचा आहेर
कुलदैवत धनदाईदेवीस नवरात्रोत्सवात दररोज नवरंगाचा आहेर, साजशृंगार चढविला जातो. आहेर चढविल्यानंतर सामुदायिक काकड आरती केली जाते. दररोज देवीजवळ अभिषेक केला जातो. रोज पहाटे व सायंकाळी महाआरती केली जात असल्याने भाविकांची गर्दी असते.
‘ऑक्टोबर हिट’च्या पार्श्वभूमीवर मंदिरालगत मंडप उभारण्यात येणार आहे. भाविकांनी परंपरेने दर्शन घेत धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळास सहकार्य करावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुभाष देवरे, उपाध्यक्ष के. एन. देवरे, खजिनदार उत्तमराव देवरे, सचिव महेंद्र देवरे व संचालक मंडळाने केले आहे.
"दरवर्षी कुलदैवत, आदिमाया धनदाईदेवीजवळ भाविकांची गर्दी वाढत आहे. भाविकांसाठी मंदिराजवळ शुद्ध, थंड मुबलक पाणी उपलब्ध असून, सावलीची सुविधा करून दिली जाईल. शक्य त्या सुविधा देण्यासाठी तरुण ऐक्य मंडळ प्रयत्नशील आहे."
- सुभाष देवरे, अध्यक्ष, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळ, म्हसदी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.